केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार येत्या १ मेपासून कोविड-१९ च्या लशींच्या मात्रा खासगी रुग्णालयांना पुरवल्या जाणार नाहीत. ‘शुक्रवारनंतर खासगी रुग्णालयांना मात्रा पुरवल्या जाणार नाहीत. वापरल्या न गेलेल्या मात्रा परत कराव्या लागतील’, असे राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी गुरुवारी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

हे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार होत असल्याचे डॉ. व्यास म्हणाले. पुरेशा लशी उपलब्ध नसल्यामुळे राज्यात लसीकरण मोहीम सुरू होऊ शकत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक दिवस आधीच पत्रकार परिषदेत सांगितले होते. तथापि, राज्यातील नागरिकांचे येत्या ६ महिन्यांत टप्प्या-टप्प्याने लसीकरण करण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे ते म्हणाले होते.

‘खासगी रुग्णालयांना यापुढे लशीच्या मात्रा मिळणार नाहीत, असे निर्देश आम्हाला राज्य सरकारकडून मिळाले आहेत’, असे सांगून जिल्ह््यातील आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने या माहितीवर शिक्कामोर्तब केले.

पुरेशा लशींअभावी पुणे जिल्ह््यात गेल्या आठवड्यापासून लसीकरण ठप्प झाले आहे. ज्या खासगी रुग्णालयांना गेल्या रविवारी मोजक्या मात्रा मिळाल्या होत्या, त्यांनी सोमवार व मंगळवारी त्यांचे लसीकरण पूर्ण केले. मात्र आता आपल्याला लशी मिळतील का याबाबत बुधवारपर्यंत त्यांना काही माहिती नव्हती. शहरातील प्रमुख रुग्णालयांशी संपर्क साधला असता, तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लशी संपल्याचे सांगितले.