फाउंड्रीवरही परिणाम

पिंपरी छ टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पात (चिखली) पुन्हा एकदा ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. येत्या ३० सप्टेंबपर्यंत टप्प्याटप्प्याने कंपनीत विभागनिहाय काम बंद ठेवण्यात येणार असून कंपनीची चिंचवड येथील फाउंड्री १० दिवस बंद राहणार आहे.

टाटा मोटर्स व्यवस्थापनाने याबाबतची नोटीस कंपनीत सूचनाफलकावर लावलेली आहे. त्यानुसार, १९ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबपर्यंत वेगवेगळ्या विभागात आवश्यकतेनुसार दोन दिवस, चार दिवस तथा सहा दिवसांचा ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत चिंचवड येथील टाटा फाऊंड्री ३० सप्टेंबपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टाटा मोटर्समध्ये गेल्या काही महिन्यांपासून ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व सुरूच आहे. जानेवारीपासून आतापर्यंत २४ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात आला. त्यातील १४ दिवस जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ातही ब्लॉक क्लोजर घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता ३० सप्टेंबपर्यंत विभागनिहाय ब्लॉक क्लोजर घेण्यात आला आहे. टाटा मोटर्सच्या सततच्या ‘ब्लॉक क्लोजर’मुळे उद्योगनगरीत चिंतेचे वातावरण आहे. वाहन उद्योगातील सततच्या मंदीमुळे वाहनांच्या विक्रीत घट होत आहे, त्याचा मोठा फटका टाटा मोटर्सला बसतो आहे. पिंपरी-चिंचवडला शेकडो उद्योग टाटा मोटर्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे कंपनीतील घडामोडींचा परिणाम शहरातील उद्योगक्षेत्रावर होतो. लघुउद्योजकांचे तर कंबरडे मोडल्याप्रमाणे अवस्था झाली आहे. दरम्यान, उत्सवी हंगाम सुरू होताच सध्याची आव्हानात्मक परिस्थिती सुधारेल, असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे.

Story img Loader