‘डेटा सेंटर’मध्ये बिघाड; नागरिकांची तारांबळ

दस्तनोंदणी आणि आधार कार्ड काढण्याबाबत सातत्याने समस्या निर्माण होत असतानाच शुक्रवारी राज्याच्या ‘डाटा सेंटर’मध्ये (एसडीसी) तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने दस्त नोंदणी आणि आधार नोंदणीसह इतर ऑनलाइन नागरी सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी होऊ न शकल्याने आणि सर्वच आधार केंद्रे बंद पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

मालमत्तांच्या खरेदी आणि विक्रीच्या दस्तांची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये शुक्रवारी सकाळपासून गर्दी होती. मात्र, सकाळी साडेअकरा वाजता यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नागरिकांना माघारी जावे लागले. बाहेरगावहून आलेल्या नागरिकांना त्याचा प्रामुख्याने फटका बसला. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा सव्‍‌र्हर बंद पडल्याने कामकाज ठप्प होण्याचे प्रकार गेल्या आठवडय़ापासून सुरू आहेत. सव्‍‌र्हरची क्षमता नसल्याने त्यावर ताण येऊन यंत्रणा विस्कळीत होत आहे. गेल्या शनिवारीही तांत्रिक बिघाड झाल्याने दस्त नोंदणी होऊ  शकली नव्हती. त्यानंतर सोमवारीही असाच प्रकार झाला. मात्र, शुक्रवारी राज्याच्या ‘एसडीसी’तच बिघाड झाल्याने दस्त नोंदणी ठप्प झाली.

राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील सव्‍‌र्हर बंद पडल्याने कामकाज विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने तातडीने सव्‍‌र्हर बदलण्याची मागणी ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स’ या संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले, की ‘सव्‍‌र्हर बंद पडण्याचे प्रकार सतत होत आहेत. त्यामुळे जास्त क्षमतेचा सव्‍‌र्हर या विभागाने घेतला पाहिजे. याबाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.’ अवधूत लॉ फाउंडेशनचे श्रीकांत जोशी आणि अ‍ॅड. चंदन फरताळे यांनीही याबाबतची मागणी सातत्याने लावून धरली आहे.

राज्याच्या ‘एसडीसी’त झालेल्या बिघाडाचा फटका आधार केंद्रांनाही बसला. गुरुवारी आधार नोंदणी आणि दुरुस्तीची माहिती मुख्य सव्‍‌र्हरवर जमा होत नसल्याने आधार नोंदणीचे काम ठप्प झाले होते. शुक्रवारी ‘एसडीसी’ची यंत्रणाच बंद पडल्याने सर्व आधार केंद्रातील सर्व कामकाज बंद झाले होते. सिक्युअर्ड फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉलमधून (एसएफटीपी) आधार नोंदणी आणि दुरुस्तीची माहिती मुख्य सव्‍‌र्हरवर जमा होत नसल्याने आधार केंद्रांच्या कामकाजामध्ये अडथळा येत असतानाच आता राज्याच्या ‘एसडीसी’ यंत्रणेतील बिघाडाची भर पडल्याने नागरिकांची मोठ अडचण झाली आहे.

यंत्रणेत बिघाड झाल्याने ‘महाऑनलाइन’शी संबंधित सर्व आधार केंद्रे बंद पडली आहेत. येत्या दोन दिवसांत कामकाज पूर्ववत होईल.   – विकास भालेराव, तहसीलदार तथा आधार समन्वयक

राज्याच्या ‘स्टेट डेटा सेंटर’मध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. दुरुरुस्तीचे काम तातडीने सुरू  करण्यात आले आहे. दुरुस्ती झाल्यानंतर दस्त नोंदणीची कामे सुरळीतपणे होतील.     – अनिल कवडे, मुद्रांक आणि नोंदणी महानिरीक्षक

Story img Loader