पिंपळे सौदागर येथिल अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या कॅशव्हॅनमधून सुरक्षारक्षकाला खाली उतरवून गाडीचालक ७४ लाख ५० हजारांच्या रोकडसह फरार झाला आहे. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या ही घटना घडली. रणजित कोरेकर असे कॅशव्हॅन चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

वाकड पोलीसांच्या माहितीनुसार, या गाडीत तब्बल ७४ लाख ५० हजार रुपयांची रोकड होती. विशेष म्हणजे ही गाडी काही तासांनी भोसरी येथील कंपनीच्या शेजारी सापडली असून गाडीतील लॉक तोडून आतील रोकड घेऊन चालक फरार झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शिवदत्त आडे यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली असून वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ब्रिनक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडे एटीएमला कॅश पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीच्या मालकीच असणारी कॅशव्हॅन (एम. एच. १४ सी एक्स ५७११) रणजित कोरेकर (वय ३२, रा. दिघी, मूळ सोलापूर) हा चालवत होता. ही कॅशव्हॅन डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली होती. या वाहनातील सुरक्षा रक्षक, दोन कॅशिअर यांनी सात एटीएममध्ये रोकड भरली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दोन्ही कॅशिर हे एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले तेव्हा चालक रणजितने वाहन घेऊन धूम ठोकली.