महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या मुद्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार दिशाहीन आहे. परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार होत्या, तर याबाबत अगोदरच निर्णय करायला हवा होता. असे त्यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलातना सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ” राज्य सरकार हे दिशाहीन आहे. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागणार होत्या. याबाबत बराच अगोदर निर्णय करायला हवा होता. कोणीही निर्णयाची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीतच बसले आहेत. परिणामी ही वेळ येते की, अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी बाहेर पडले आहेत. मला मान्य आहे की मराठा समाजाचे तरूण-तरूणी खूप अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांच्या भवितव्याबाबत चिंता आहे. त्यांच्याकडून जो विरोध झाला, हा विरोध जर मान्य असेल, तर सरकारने वेळेत या परीक्षा पुढे ढकलायला हव्या होत्या. ११ ताखेला परीक्षा असताना तुम्ही ९ तारखेला निर्णय घेत आहात, हे काही बरोबर नाही.”

मराठा समाजातील तरूण-तरूणींना सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगिती उठून न्याय कधी मिळणार? एक महिना झाला सर्वोच्च न्यायालयाने निर्णयास स्थगिती दिली आहे. महिनाभर तुम्ही काहीच हालचाल केली नाही. आता कुठं तुम्ही तुमचे वकील सर्वोच्च न्यायालयात पाठवून तुम्ही विनंती करत आहात. म्हणजे, एमपीएसीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर जर सर्वोच्च न्यायालयात निर्णय लवकर लागणार नसेल, तर पुन्हा एकदा एमपीएससीच परीक्षा असेल तेव्हा हीच परिस्थिती  येणार आहे. मुळात तुम्ही खरं बोला, तुम्ही जर म्हणत आहात की करोनामुळे परीक्षा पुढे ढकलली. तसं असेल तर अगोदरच पुढे ढकलायला हवी होती. असं पाटील यांनी राज्य सरकारला सुनावलं.

आणखी वाचा- “जास्त चर्चा करु शकत नाही,” मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भुजबळ नाराज?

करोना हळूहळून नियंत्रणात येत आहे. मग, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात निर्णय लागण्या अगोदर, करोना नियंत्रणात आल्यामुळे तुम्ही परीक्षा घेणार आहात का? कशाचा कशालाही थांगपत्ता नाही. हे शासन करोनाच्याबाबत गंभीर नाही. शेतकरी समस्या, महिला अत्याचाराचे प्रश्न व तरूणांच्या भविष्याबाबतही गंभीर नाही. असा देखील आरोप यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.