विज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित संशोधन पत्रिका मानल्या जाणाऱ्या ‘नेचर’ने जगभरातील १०० शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली आहे. ‘नेचर इंडेक्स नॉर्मलाइज रँकिंग’ असे नाव असलेल्या या क्रमवारीत जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स यांनी स्थान मिळवले आहे.

‘नेचर’ने २०१८-१९ साठी प्रसिद्ध केलेल्या या क्रमवारीमध्ये पहिल्या तीन क्रमांकांवर अनुक्रमे अमेरिकेतील कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी, ऑस्ट्रियाची इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इस्रायलची वेइजमन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्था आहेत. भारतातील बेंगळुरूची जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज सातव्या स्थानी, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था समूह (आयसर) २४ व्या स्थानी आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ९५व्या स्थानी आहे. आयसर समूहामध्ये आयसर बेहरामपूर, आयसर भोपाळ, आयसर कोलकाता, आयसर मोहाली, आयसर पुणे, आयसर तिरुअनंतपुरम आणि आयसर तिरुपती यांचा समावेश होतो. तर प्रतिष्ठित मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (११ व्या), स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी (१२ व्या), केंब्रिज (३२ व्या), येल युनिव्हर्सिटी (३६ व्या) अशा शिक्षण संस्थांचाही क्रमवारीत समावेश आहे.

‘स्थापनेनंतर तुलनेने कमी कालावधीत आयसर समूहाने केलेली कामगिरी आनंददायी आहे. त्यामुळेच २०१९ च्या नेचर इंडेक्स नॉर्मलाइज रँकिंगमध्ये संस्थेचा समावेश होणे ही मोठी गोष्ट आहे. प्रकाशने आणि पेटंट्सच्या माध्यमातून उत्तम संशोधन होण्यासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे. या पुढील काळातही अशाच पद्धतीने काम करण्याला प्राधान्य असेल,’ असे आयसर पुणेच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव गलांडे यांनी सांगितले.

‘नॉर्मलाइज रँकिंग’ म्हणजे काय?

नॉर्मलाइज रँकिंगमध्ये संस्था किती नामवंत, मोठी आहे किंवा जुनी आहे यापेक्षा तुलनेने नव्या आणि लहान असलेल्या संस्थांतील संशोधनाची गुणवत्ता आणि संख्या विचारात घेण्यात आली आहे. या संस्थांमधून विज्ञानाशी संबंधित संशोधन पत्रिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधप्रबंधांचा स्वतंत्र समितीने नेचर इंडेक्स डेटाबेसमधून शोध घेऊन त्या नुसार ही क्रमवारी तयार केली आहे.

Story img Loader