जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात 242 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा करोनाने बळी घेतला.
शहरातली करोनाबाधितांची एकूण संख्या आता 6 हजार 93 एवढी झाली आहे. तर आज पर्यंत करोनामुळे 303 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आज उपचार घेत असलेल्या 186 रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर 3 हजार 450 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.
पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरात देखील करोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज दुपारी चार वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात ४९ करोना बाधित रुग्ण आढळले असून यात शहरा बाहेरील ११ रुग्णाचा समावेश आहे. तर जुन्नर आणि सांगवी परिसरातील दोघांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या ४९७ वर पोहचली असून, आज १४ जण करोना मुक्त झालेले आहेत. शहरातील आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २११ जण झाली असून, शहराबाहेरील २५ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. आत्तापर्यंत शहराच्या हद्दी बाहेरील १२ तर शहरातील ८ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 682 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 116 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये 8 हजार 381 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची 62 हजार 228 इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 26 हजार 997 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या घडीला 33 हजार 124 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.