पुणे : करिअरमध्ये कलाटणी देणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे यश संपादन करण्याने सार्थक झाले. आता जेथे संधी मिळेल तेथे प्रामाणिकपणा आणि ध्येयनिष्ठेने काम करून संधीचे सोने करू, असा आत्मविश्वास स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
पीयूष साळुंके (६३ वा) : दुसऱ्याच प्रयत्नामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचा विलक्षण आनंद आहे. अभ्यास कशा पद्धतीने करायचा याची दिशा युनिक अॅकॅडमीमध्ये मिळाली. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असून जिथे संधी मिळेल तिथे उत्तम प्रशासन देण्याचाच माझा प्रयत्न राहील.
वल्लरी गायकवाड (१३१ वी) : आयएलएस विधी महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी आणि नंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये जाण्याची इच्छा असून त्यालाच प्राधान्य दिले आहे. परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरीला असलेले महत्त्व ध्यानात घेऊन या धोरणाद्वारे देशात सुयोग्य बदल घडवून आणता येऊ शकतात याची खात्री असल्यामुळे भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये जाणार आहे. स्वयंअध्ययनावर आणि उत्तर लेखनाच्या पद्धतीवर विशेष भर दिल्याने हे यश संपादन करता आले.
जगदीश जगताप (३०४ वा) : मी मूळचा कराड (जि. सातारा) येथील कोडोली गावचा. दंतवैद्यक विषयात मी पदवी संपादन केली आहे. माझे आई-वडील शेतकरी आहेत. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मला हे यश मिळाले आहे. कष्टाचे सार्थक झाल्यामुळे मी आनंदी आहे.
मराठी मुलांना मोठी संधी : जाधव
‘युनिक अॅकॅडमी’च्या दहा विद्यार्थ्यांनी पहिल्या शंभरामध्ये स्थान पटकाविले आहे. एकूण गुणवत्ता यादीमध्ये ६८ विद्यार्थी चमकले आहेत. युनिक अॅकॅडमीतून मार्गदर्शन घेतलेले गिरीश बडोले हे देशात विसाव्या स्थानी असून राज्यात पहिले आले आहेत, अशी माहिती युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव आणि मल्हार पाटील यांनी दिली. बिपाशा कलिता (४१ वी), दिग्विजय बोडके (५४ वा), भुवनेश पाटील (५९ वा), पीयूष साळुंके (६३ वा), रोहन जोशी (६७ वा), पुष्प लता (८० वी), अमोल श्रीवास्तव (८३ वा), प्रतीक जैन (८६ वा), मयूर काथवटे (९६ वा) हे विद्यार्थी पहिल्या शंभरामध्ये आहेत. युनिक अॅकॅडमीमध्ये पूर्व व मुख्य परीक्षा तसेच मुलाखत अशा विविध पातळीवर मार्गदर्शन घेतलेल्या पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अंतिम निवड यादीमध्ये स्थान पटकाविले आहे. दुसऱ्या प्रयत्नांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून अभियांत्रिकी शिक्षणाची पाश्र्वभूमी असलेले ७० टक्के विद्यार्थी आहेत. मुलींच्या प्रमाणात लक्षणीय वाढ व्हायला हवी. तसेच मराठी माध्यमातून मुलांना या परीक्षेमध्ये मोठी संधी आहे, असे मत तुकाराम जाधव यांनी व्यक्त केले.
‘चाणक्य’चे २८ विद्यार्थी
‘चाणक्य मंडल’चे २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या शंभरामध्ये चाणक्य मंडलचे सहा विद्यार्थी झळकले आहेत. शिस्त, अनुभवांतून शिकणं आणि मेहनत याच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले, असे चाणक्य मंडलचे प्रमुख आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.