‘लोकसत्ता’च्या राखी चव्हाण यांना ‘पर्यावरण पत्रकार सन्मान’ जाहीर
पर्यावरणविषयक विविध चित्रपट आणि लघुपटांचे प्रदर्शन, तसेच वन्यजीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील प्रश्नांचा वेध असे स्वरूप असलेला ‘किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ३ ते ७ जानेवारी दरम्यान येथे रंगणार आहे. किलरेस्कर’ आणि ‘वसुंधरा क्लब’ यांच्यातर्फे या तेराव्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘प्लास्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ ही या महोत्सवाची केंद्रीय संकल्पना आहे. किलरेस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचुड आणि महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवाचे उद्घाटन ३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर , बालगंधर्व कलादालन आणि घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरु कलादालन तसेच परिसरातील ५० महाविद्यालयांमध्ये या महोत्सवातील कार्यक्रम होतील.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले १६१ चित्रपट आणि लघुपट रसिकांसाठी महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. महोत्सव पर्यावरण प्रेमींसाठी विनामूल्य खुला असून kirloskarvasundharafest.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
यावर्षी महोत्सवात राम नदी संवर्धन परिषद, राम नदी कृती कार्यक्रम, राम नदी परिक्रमा तसेच पर्यावरण विषयक ७० कार्यक्रम होणार आहेत. त्यात नेचर वॉक, प्रश्नमंजूषा, परिसंवाद, दृकश्राव्य व्याख्याने, पथनाटय़ स्पर्धा, चर्चासत्रे या कार्यक्रमांचा समावेश आहे.
चैत्राम पवार, बाचुळकर यांचाही गौरव
या वर्षीचा ‘किलरेस्कर वसुंधरा सन्मान’ धुळे येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ चैत्राम पवार यांना, ‘ग्रीन टिचर सन्मान’ कोल्हापूरचे डॉ. मधुकर बाचुळकर यांना आणि ‘पर्यावरण पत्रकार सन्मान’ ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीच्या खास प्रतिनिधी राखी चव्हाण यांना प्रदान करण्यात येणार आहे.