७५ वाहनांची क्षमता असताना ५०० वाहनांची ये-जा; सुरक्षा कर्मचाऱ्यांची दररोज तारेवरची कसरत

पिंपरी-चिंचवड शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, त्या पालिका मुख्यालयातही या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्यालयात जेमतेम ७५ वाहने लावण्याची क्षमता असताना, दिवसभरात तब्बल ५०० वाहनांची ये-जा होत असल्याने या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. सात-आठ वर्षांपासून ही समस्या कायम आहे. मात्र, त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सतत वादावादीच्या प्रकाराने सुरक्षारक्षक हैराण झाले आहेत.

पिंपरी पालिका मुख्यालयात दररोज विविध कामांसाठी नागरिक येतात, त्यांची वाहने मुख्यालयात उपलब्ध असलेल्या जागेत लावण्यात येतात. महापौर, आयुक्त व पदाधिकाऱ्यांसह काही जागा राखीव ठेवल्या जातात. उर्वरित जागेत ७५ वाहने कशीबशी लावता येतात. मात्र, मुख्यालयात येणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे ५०० पर्यंत असल्याचे सांगण्यात आले. मुख्यालयातील जागा अपुरी पडते. त्यामुळे मुख्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर तसेच गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने लागलेली असतात. महामार्गावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करतात, तरीही त्या ठिकाणी वाहने लावलेली असतात.

पालिका सभा किंवा निवडणुकांच्या दिवशी वाहनांची संख्या नेहमीपेक्षा बरीच वाढते, तेव्हा सर्वाचाच खोळंबा होतो.जिंजर हॉटेलसमोर पर्यायी जागा आहे, तेथे कोणी वाहन लावण्यासाठी जात नाही. सर्वाचा आग्रह मोक्याच्या ठिकाणी जागा मिळावी, असाच असतो. जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही अनेक नागरिक तशीच वाहने लावून जातात. वाहनचालक जर राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल तर हमखास वाद होतो. काही सांगण्याचा प्रयत्न केल्यास सुरक्षारक्षकांना दमदाटी होते. कार्यकर्ते, नगरसेवकांना हटकले तरी त्यांना राग येतो, पत्रकार कोणाचे ऐकत नाहीत.

आठ वर्षांपासून ही समस्या असून त्यावर ठोस तोडगा निघालेला नाही. अलीकडे, हा प्रश्न खूपच जटील होत चालला असून प्रशासनाकडून मात्र कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader