पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे भागात पोलिसांनी रक्तचंदनाची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतलं आहे. सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही कारवाई केली असून, मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेल्या रक्तचंदनाची रक्कम १० कोटींच्या घरात असल्याचं कळतंय.
सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान पुनवळे येखील ताज ढाबा परिसरात वाकड पोलिसांचं एक पथक गस्तीसाठी उभं होतं. यावेळी ढाब्याच्या आवारात उभा असलेल्या कंटेनरची तपासणी केली असता, पोलिसांना यात रक्तचंदन आढळून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्याजवळ या कंटेनरमध्ये माल भरण्यात आला असून तो मुंबईच्या दिशेने जात होता. तपासणीदरम्यान पोलिसांना या कंटेनरमध्ये दारुच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या, या कारणासाठी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.
आयुर्वेदीक औषधांमध्ये रक्तचंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कर्नाटक भागात रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मात्र साताऱ्यावरुन निघालेला हा कंटनेर नेमका कोणाच्या मालकीचा आहे व आत भरलेला रक्तचंदनाचा साठा कोणासाठी नेण्यात होता याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. वाकड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.