पिंपरीच्या महापौरांची ग्वाही
पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी करण्याबरोबरच येथील वारकरी सांप्रदायाची परंपरा जपण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी आकुर्डीत बोलताना दिली. शहरविकासाच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
काळभोरनगर येथे उभारण्यात आलेल्या वारकरी शिल्पाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, स्थानिक नगरसेविका वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.
महापौर म्हणाले, देहू-पंढरपूर वारीतील तुकोबांच्या पालखीचा दुसरा मुक्काम आकुर्डीत असतो. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे प्रातिनिधिक स्वागत करणारे हे शिल्प आहे. वाघेरे म्हणाले, नगरसेविका काळभोर यांनी हे शिल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळेच शहराच्या वैभवात भर घालणारे शिल्प उभे राहू शकले.