दीर्घ पल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे होणारा वेळ, रस्ते दुरवस्थेचा परिणाम 

आज राष्ट्रीय अस्थिविकार जनजागृती दिन

पुणे : कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी करावा लागणारा शहरांतर्गत दीर्घपल्ल्याचा प्रवास, रहदारीच्या प्रमाणामुळे प्रवासात जाणारा वेळ आणि भर म्हणून रस्त्यांची बिकट अवस्था यांमुळे पाठीच्या आणि मणक्याच्या विकारांनी ग्रस्त असलेल्या पुण्यातील तरुण रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

सांधे आणि अस्थिविकारांबाबत जागृतीसाठी आज देशभर नॅशनल बोन्स अ‍ॅण्ड जॉईंट्स डे साजरा होत असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुचाकी वरुन प्रवास करणाऱ्या तरुणांमध्ये पाठीचे दुखणे, मणक्याचे विकार, स्लीपडिस्क, हाता-पायांचे सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत असून अस्थिविकारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी चाळीस टक्के रुग्ण हे चाळीस वर्ष वयाच्या आतले असल्याचे अस्थिविकार तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. धकाधकीचे आयुष्य, त्यातून बदललेली जीवनशैली, व्यायाम आणि चौरस आहाराचा अभाव असल्याने या दुखण्यांचे तरुणांमधील प्रमाण प्रचंड असल्याचे डॉक्टर सांगतात.

संचेती रुग्णालयातील डॉ. केतन खुर्जेकर म्हणाले, उच्च शिक्षण घेतलेले आणि जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असलेले अनेक तरुण रुग्ण स्पाँडिलायसिस, सांध्याचे दुखणे, मान अवघडणे अशा तक्रारी घेऊन येतात. संगणकासमोर बसून काम करताना योग्य काळजी न घेणे, दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट न वापरणे यांमुळे हे विकार सुरु होतात. वेळेवर उपचार न घेतल्यास ते गंभीर रुप धारण करतात. आयटी कंपनीत काम करणारे अनेक तरुण-तरुणी दीड ते दोन तास दुचाकी चालवत कार्यालय ते घर आणि घर ते कार्यालय असा प्रवास करतात. प्रवासात जाणारा वेळ आणि खराब रस्ते यांमुळे पाठ आणि मणक्यांच्या आजारांचे वय अलिकडे आल्याचे डॉ. खुर्जेकर यांनी स्पष्ट केले. हेल्मेट आणि सीटबेल्ट या अत्यावश्यक खबरदारीच्या गोष्टींचे पालन न केल्याने अपघात होऊन अंथरुणाला खिळलेले अनेक रुग्ण तरुण वयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नितीन भगली म्हणाले, पाठ आणि मानेचे दुखणे, स्लीपडिस्क आणि स्लीपडिस्कचा झटका येणे, मणक्याचे विकार, खांदे दुखणे अशा सर्व प्रकारच्या दुखण्यांचे प्रमाण तरुण रुग्णांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. स्लीपडिस्कच्या झटक्यामुळे हाता-पायांना मुंग्या येणे, नैसर्गिक विधींचे नियंत्रण जाणे अशा गोष्टी घडतात. रस्त्यांची बिकट परिस्थिती, बेशिस्त वाहतुकीमुळे दुचाकी चालवणाऱ्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून २५ ते ३५ वर्षे वयोगटातले सर्वाधिक रुग्ण उपचारांसाठी येतात, अशी माहिती डॉ. भगली यांनी दिली. शहरांतर्गत रस्त्यांची परिस्थिती पाठ, ममका, कंबर यांच्या दुखण्यांना आमंत्रण देणारी असून वाहन चालकांनीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

काय काळजी घ्याल?

* हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करा.

* रोज किमान पंधरा मिनिटे सूर्यनमस्कार आणि योगासने करा.

* ड जीवनसत्व आणि कॅल्शिअम यांची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

* चौरस आहार घ्या. दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा आहारात समावेश करा.

* दुचाकीचे हँडल आणि चारचाकीमध्ये सीट यांमुळे दुखणे आढळल्यास योग्य ते बदल करा.