पुणे : ‘कर्करुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पुण्यात कर्करोग रुग्णालय उभारण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाशेजारील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) जागा योग्य आहे. या जागेची कर्करोग रुग्णालयासाठी मागणीही करण्यात आली आहे,’ अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
विशेष म्हणजे ही जागा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एका विकासकाला कवडीमोल दराने देण्यात आली होती. आता भाजपच्या मंत्र्यांनीच या जागेची पुन्हा मागणी केली आहे. यामुळे सरकारमधील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शरद सोनवणे, भीमराव तापकीर आणि विक्रम पाचपुते यांनी ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयासंबंधी लक्षवेधी प्रश्न मांडला होता. या प्रश्नांना उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘ससून रुग्णालयात पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात वर्षाला साडेपाच लाख रुग्ण येतात. पुणे शहरातील जवळपास ६० हजार रुग्ण येथे दाखल होतात. रुग्णालयात १५५ रुग्णशय्यांचा अतिदक्षता विभाग आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयावर ताण पडत आहे.’
‘ससून रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतीच १२ कोटी ९४ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. तसेच, उपकरणांचीहीदेखील खरेदी करण्यात आली. याचबरोबर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे,’ असेही मिसाळ यांनी सांगितले.
पदभरती करणार
‘ससून सर्वोपचार रुग्णालयात २ हजार ३५० पदे मंजूर आहेत. त्यातील ७९६ पदे ही रिक्त असून, परिचारिकांची १५६ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी निम्मी पदे वर्ग चारची आहेत. येत्या आठ दिवसांत या पदांची भरती प्रक्रिया राबवविण्यात येईल. तसेच, वर्ग एकची ४४ आणि वर्ग दोन ची ११० रिक्त पदे तत्काळ भरली जातील,’ असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
ससूनमधील अधिष्ठाता बदलावर प्रश्न
गेल्या दीड वर्षात ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता सातत्याने बदलत राहिले आहेत. गेल्या वर्षी जूनपासून प्रभारी अधिष्ठात्यांकडे रुग्णालयाचा कार्यभार आहे. रुग्णालयात प्रशासकीय स्थैर्य नसल्याने व्यवस्थापनात त्रुटी राहात आहेत, याकडे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत बोलताना सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘ससून रुग्णालयात एमआरआय तपासणी यंत्र बंद पडणे, तपासणी करण्यासाठी दोन-दोन दिवस ताटकळत थांबावे लागणे, हे नित्याचे झाले आहे. खासगी संस्थांमधून एमआरआय तपासणी करून घेणे नागरिकांना महागात पडते. यामुळे ससून रुग्णालयात एमआरआय मशीन सहजपणे उपलब्ध होणे गरजेचे असून, त्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी.