लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यभरातील कला केंद्रामध्ये सर्रासपणे सुरू असलेले डान्स बार तातडीने बंद करण्याची मागणी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी शुक्रवारी केली. कला केंद्रातील तबला, ढोलकी आणि पायपेटी ही वाद्ये आणि लावणी गायिका यांना वगळून तेथे डीजे वाजवून कला सादर केली जात असल्याने राज्यभरातील दहा हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, ‘शेतकऱ्यांप्रमाणे कलाकारांनीही आत्महत्या करायची का,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मागण्या केल्या. अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, विकास जावळेकर, चंद्रकांत लाखे या वेळी उपस्थित होते. पुणेकर म्हणाल्या, ‘माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्स बार बंद केल्यानंतर लावणी कलाकारांना दिलासा मिळाला होता.

मात्र, त्यानंतरच्या सरकारने आणि गृहमंत्र्यांनी कडक धोरण न राबविल्यामुळे डान्स बार पुन्हा सुरू झाले आहेत. तबला, ढोलकी आणि पायपेटी ही वाद्ये वाजविणारे वादक आणि लावणी गायिका अशा पारंपरिक पद्धतीने लोककला सादर करण्याच्या अटीवरच कला केंद्रांना परवाना दिला जातो. या गोष्टींनाच हरताळ फासला जात आहे. राज्यात संगीतबारीच्या ८२ पैकी निम्म्याहून अधिक कला केंद्रांमध्ये डीजे सुरू आहेत. त्यामुळे कला केंद्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.’

जावळे म्हणाले, ‘पुण्यातील पाचही कला केंद्रांमध्ये डीजे सुरू आहेत. लातूर, अहिल्यानगर, जामखेड, बीड येथेही अशीच परिस्थिती आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी संबंधित पोलिसांना निवेदन दिले. मात्र, त्यावर ठोस कारवाई होत नाही. याबाबत आम्ही संघटनेच्या वतीने सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांच्या हे निदर्शनास आणून दिले आहे. आम्हाला सरकारकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे.‘

लोककलेच्या क्षेत्रात नवीन कलाकार घडावेत, यासाठी ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या आमच्या मागणीला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. -धोंडीराम जावळे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटना

Story img Loader