लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दोन कोटीच्या खंडणीसाठी शासकीय बांधकाम ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून खून प्रकरणात गुंड योगेश उर्फ बाबू भामे याच्यासह साथीदारांविरुद्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले.
योगेश उर्फ बाबू किसन भामे (वय ३२), रोहित उर्फ बाळा किसन भामे (वय २२, दोघे रा. डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली), मिलिंद देवीदास थोरात (वय २४, सध्या रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), शुभम पोपट सोनवणे (वय २४, सध्या रा. नगर रस्ता, मूळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), रामदास दामोदर पोळेकर (वय ३२, रा. पोळेकरवाडी, डोणजे, सिंहगड पायथा, ता. हवेली) अशी ‘मकोका’ कारवाई केलेल्यांची नावे आहेत. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पोळेकर सकाळी फिरायला निघाले होते. त्या वेळी आरोपी भामे आमि साथीदारांनी ठेकेदार पोळेकर यांना धमकावून त्यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात फेकून दिले होते.
आरोपी भामे आणि साथीदारांनी सिंहगड रस्ता, डोणजे, खडकवासला परिसरात गंभीर गुन्हे केले होते. त्यांनी ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती. पोळेकर यांच्याकडून रस्त्याचे काम करण्यात येत होते. भामे याने रस्त्याच्या कामात अडथळा आणण्याची धमकी दिली होती, तसेच भामे याने पोळेकर यांच्याकडे महागडी मोटार मागितली होती. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांचे अपहरण करुन निर्घृण खून केला होता. याप्रकरणाचा तपास ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा, तसेच हवेली पोलिसांनी केला होता. टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी भामे आणि साथीदारांनी गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले होते.
भामे आणि साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव हवेली पोलिसांनी तयार केला. संबंधित प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आल्यानंतर भामेसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचे आदेश देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी तपास करत आहेत.