लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती या तीन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षाचे नेते नक्की काय प्रयत्न करणार याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने घेतला आहे. यामध्ये खडकवासला, पर्वती, हडपसर, वडगाव शेरी या चार मतदारसंघांतून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा या मतदारसंघातून काँग्रेस, तर कोथरूडमधून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष निवडणूक लढविणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या शिवाजीनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने मनीष आनंद नाराज झाले असून त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे.
आणखी वाचा-शहरातील पूरस्थितीच्या अहवालाची प्रत देण्यास पालिकेचा नकार, काय आहे कारण..?
कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी माजी महापौर आणि काँग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे प्रयत्नशील होत्या. मात्र या मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज व्यवहारे यांनी बंडाचा झेंडा फडकावित निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे आहे. मात्र, पर्वतीमधून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल प्रयत्नशील होते. या मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने माजी नगरसेविका अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बागुल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.