लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : संभाजी पोलिस चौकीच्या मागे असलेल्या नदीपात्रातील जागेत महापालिकेलाही न जुमानता बेकायदा जाहिरातफलक उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जाहिरात फलकाला महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नसताना आणि महापालिकेने होर्डिंग उभारताना आक्षेप घेतल्यानंतरही हे होर्डिंग उभे राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सामान्य नागरिकांना एरव्ही दंड आणि कारवाईच्या माध्यमातून दणका देणारी महापालिका या व्यावसायिकावर मेहेरबान का होत आहे, असा प्रश्न या निमित्त उपस्थित झाला आहे.

होर्डिंग उभारणारी व्यक्ती सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबधित असून, शहरातील राजकीय नेत्यांचा हात त्याच्या डोक्यावर असल्याने कारवाई करण्याासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिस टाळाटाळ करीत असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. नदीपात्रात कोणत्याही प्रकारची होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.

याकडे दुर्लक्ष करत टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या मागे असलेल्या जागेत मोठे होर्डिंग उभारण्याचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. या होर्डिंगची परवानगी कोणी दिली याची विचारणा करण्याासठी गेलेल्या आकाशचिन्ह विभागाच्या कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरत या व्यावसायिकाने हाकलून दिले होते.

नदीपात्रातील याच जागेवर दीड ते पावणेदोन वर्षापूर्वी एक होर्डिंग उभारण्यात आले होते. महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवानगीमुळे हे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरत महापालिका प्रशासनाला विचारणा केली होती. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत हे होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने हे होर्डिंग काढून टाकले होते.

बेकायदा होर्डिंग केवळ नटबोल्टवर… नागरिकांच्या जिवाला धोका

आता पुन्हा याच ठिकाणी हे होर्डिंग उभारण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी कारवाई करत कापलेल्या लोखंडी फाउंडेशनवरच आता नट-बोल्ट च्या साहाय्याने होर्डिंगचा हा सांगाडा उभारण्यात आला आहे. केवळ नटबोल्टवर हा सांगाडा उभा राहत असल्याने तो धोकादायक असून, काही दुर्घटना घडल्यानंतर महापालिका याची जबाबदारी घेणार का, अशी विचारणा येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

तक्रार दिली पण प्रत मिळेना

होर्डिंग उभारणाऱ्या व्यक्तीकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी करून त्यांना हुसकावून लावण्यात आले होते. या प्रकरणी संबधित व्यावसायिकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार महापालिका कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याची प्रत अजूनही पोलिसांकडून महापालिकेला देण्यात आलेली नाही. पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये हे होर्डिंग अनधिकृत म्हणून पाडण्यात आले होते, वाहतूक ना हरकत, मालकाचे संमतिपत्र, वृक्ष संवर्धन विभागाने दिलेले ना हरकत यांची मुदत संपली आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी म्हणाले, या होर्डिंगची महापालिकेचे कर्मचारी चौकशी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी अरेरावी भाषा वापरुन कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिस गुन्हा दाखल करतील. तसेच, होर्डिंगच्या कागदपत्राची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Story img Loader