लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वास्तुरचना शास्त्रात देशातील शिखर संस्था असणाऱ्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या अर्बन स्टुडिओ रीसर्च प्रोजेक्ट (यूएसआरपी) या स्पर्धेत डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि ४० विद्यार्थिनींनी मिळून साकारलेल्या अभ्यास प्रकल्पात रास्ता पेठेच्या समूह पुनर्विकासाची संकल्पना (क्लस्टर डेव्हलपमेंट) मांडण्यात आली होती.
बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात कौन्सिलचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते महाविद्यालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या तीन पुरस्कारांमध्ये ‘बीएनसीए’च्या प्रकल्पाचा समावेश आहे. बीएनसीएतील डॉ. वैशाली अनगळ यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटात डॉ. शार्वेय धोंगडे, डॉ. सुजाता कर्वे, प्रा. चैतन्य पेशवे, प्रा. सोनाली मालवणकर, प्रा. देवा प्रसाद आणि प्रा. सिद्धी जोशी यांचा सहभाग होता.
रास्ता पेठ समूह पुनर्विकास प्रकल्पाबाबत डॉ. अनगळ म्हणाल्या, ‘ऐतिहासिक वारसा असलेल्या रास्ता पेठेतील शहरी पोत हा त्यातील वास्तुरचनेच्या दृष्टीने असणारे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि संस्कृतीतून जोपासला गेला आहे. त्यातूनच या परिसराशी तेथील रहिवाशांचे भावनिक बंध निर्माण झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन समूह पुनर्विकासाच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला. या परिसरातील लोकसंख्या घनता, संयुक्त विकास नियंत्रण आणि वृद्धी अधिनियम ऊर्फ यूडीसीपीआरच्या (युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन) मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बीएनसीएतील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनींनी एक संभाव्य समूह पुनर्विकासाचे प्रारूप (मॉडेल) तयार केले. त्यामध्ये या परिसरात निवासायोग्य मापदंडाचाही विचार करण्यात आला. एप्रिल २०२३ मध्ये एका कार्यशाळेच्या माध्यमातून हे प्रारूप रास्ता पेठेतील रहिवाशांसमोर मांडण्यात आले. त्यात रास्ता पेठ पुनर्विकासाबाबतचे फलक, त्रिमितीय प्रतिकृती आणि आभासी तंत्रज्ञानाचा (व्हर्च्युअल रिॲलिटी) वापर करण्यात आला.
या प्रकल्पात स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेतलेल्या कार्यशाळेतून समोर आलेले निष्कर्ष, मार्गदर्शक तत्त्वे आणि यूडीसीपीआरमध्ये बदल करण्याविषयी सूचना राज्य सरकारला सादर करण्यात येतील. त्यातील पथदर्शी मार्गदर्शक तत्त्वांचा वापर ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या रहिवासी वस्त्यांमधील समूह पुनर्विकासासाठी प्रभावीपणे करणे शक्य असल्याचे डॉ. अनगळ यांनी सांगितले.
रास्ता पेठ समूह पुनर्विकास अभ्यास प्रकल्पातून विद्यार्थिनींना त्या भागातील तळागाळातल्या नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. शहर विकासाशी संबंधित हा अभ्यास प्रकल्प आदर्शवत आहे, असे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले.