वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या ‘सुपरस्पेशालिटी’ आणि दररोज काहीतरी नवीन सुधारणा होणारे तंत्रज्ञान अशा वातावरणात काम करताना डॉक्टरांना आपल्या वैद्यकीय शाखेसह इतरही शाखांची माहिती घेणे आवश्यक वाटू लागले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या डॉक्टरांच्या प्रमुख संघटनेने ‘जनरल प्रॅक्टिशनर’ डॉक्टरांसाठी सुरू केलेल्या ‘जीपीकॉन’ या परिषदेला आता ‘सुपरस्पेशालिटी’ परिषदेचे स्वरूप आले आहे. रुग्णाला एकाच वेळी विविध आजार असू शकतात, त्यामुळे इतर वैद्यकीय शाखांमध्ये सध्या काय सुरू आहे हे माहीत असणे अपरिहार्य असल्याची अशी भावना डॉक्टर व्यक्त करत आहेत.
आयएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भुतकर म्हणाले, ‘२५ वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टरांसाठी वैद्यकीय परिषदा होत नसत. केवळ विशेषज्ञांच्या परिषदा होत. त्यामुळे त्या वेळी जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांसाठी संघटनेने परिषद सुरू केली. पण तिचे स्वरूप हळूहळू बदलत गेले असून आता परिषदेत मल्टिस्पेशालिटीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. विशेषज्ज्ञ डॉक्टरांनाही दुसऱ्याच्या शाखेत काय सुरू आहे हे ऐकण्याची संधी मिळत नाही. वैद्यकीय शाखांमध्ये इतके नवनवे तंत्र येत असते की ते पाठय़पुस्तकांमध्ये येण्यासही वेळ लागतो.’
या वर्षीची ‘जीपीकॉन’ १२ व १३ डिसेंबरला अण्णा भाऊ साठे सभागृह येथे होणार आहे. आतापर्यंत त्यासाठी ३५० एमबीबीएस डॉक्टर व विशेषज्ञांनी नोंदणी केली असल्याचेही डॉ. भुतकर यांनी सांगितले. संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. के. के. अगरवाल व खासदार अनिल शिरोळे या वेळी उपस्थित राहणार असून अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे, डॉ. नीरज आडकर, डॉ. राघव बर्वे, डॉ. अमोल रेगे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. मंगला वाणी, डॉ. राजेंद्र नाखरे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पत्की, डॉ. महेश कागली, फिजिशियन डॉ. चंद्रशेखर फणसळकर, कर्करोगतज्ज्ञ डॉ. संजय दुधाट, डॉ. शोना नाग, लॅप्रोस्कोपिस्ट डॉ. नीरज रायते यांची या वेळी व्याख्याने होतील.
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2015 रोजी प्रकाशित
डॉक्टर घेताहेत एकमेकांच्या वैद्यकीय शाखांची माहिती!
इतर वैद्यकीय शाखांमध्ये सध्या काय सुरू आहे हे माहीत असणे अपरिहार्य असल्याची अशी भावना डॉक्टर व्यक्त करत आहेत

First published on: 28-11-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%b5ranches medical information doctor health