‘एमईएमएस’ रुग्णवाहिकांची सेवा; प्रचंड गर्दीतही रुग्णालयांत पोहोचवले

विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने झालेल्या प्रचंड गर्दीतून वाट काढत अत्यावश्यक सेवेच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान १६ रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले, तर १४६ रुग्णांना जागीच उपचार देण्यात आले.

‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्‍‌र्हिसेस’च्या (बीव्हीजी एमईएमएस) डॉ. ज्योत्स्ना माने यांनी ही माहिती दिली. मिरवणूक बघायला आलेल्यांच्या गर्दीत धक्काबुक्की होणे, वाहनांवरून खाली पडणे, मिरवणुकीत नाचताना धडपडून दुखापत होणे, मधुमेहाचा त्रास, श्वास घ्यायला त्रास होणे, बेशुद्ध पडणे अशा विविध कारणांमुळे १५ रुग्णांना रुग्णालयात न्यायची वेळ आली, तर एकाला मारामारीत लागल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले.

१४०० जणांची तपासणी

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे गणेशोत्सवात चालवण्यात आलेल्या ‘मिनी हॉस्पिटल’मध्ये विसर्जनकाळात उच्च रक्तदाब, सांधेदुखी, अंगदुखी, ताप, छातीत दुखणे, खरचटणे, अशक्तपणामुळे चक्कर येणे अशा तक्रारी असलेल्या १४०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

पोलीस आणि गणपती बघायला आलेल्या नागरिकांचा या रुग्णांमध्ये समावेश होता. उत्सवाच्या दहा दिवसांत या उपक्रमात ३८५० जणांची तपासणी करुन त्यांना औषधे व वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली.

ताप आल्यामुळे डेंग्यु आणि चिकुनगुनियाच्या भीतीने तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी होती, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी दिली. डॉ.उमेश आंबेगावकर, डॉ.सुजाता बरगाले, डॉ. भूषण रंदाळे, डॉ. तेजश्री माने, नीलेश सोनिगरा, जगदीश मुंदडा यांच्यासह मिनी हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टरांचा चमू व रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच, महिलांकरिता दोन खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता.

रुग्णवाहिकांना कोंडीचा ‘ताप’

मिरवणूक बघायला उसळलेल्या गर्दीच्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना मोठाच त्रास झाला. चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिका अनेक ठिकाणी बघायला मिळत होत्या. शुक्रवारी सकाळी मिरवणूक पाहून घरी जाणाऱ्यांच्या वाहनांमुळेही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. रुग्णवाहिका सायरन वाजवत असूनही कशाही आडव्या-तिडव्या लावलेल्या वाहनांमुळे कोंडी सुटण्यास वेळच लागत असल्याचे चित्र होते. ‘एमईएमएस’च्या एका रुग्णवाहिकेचे चालक शांताराम यादव म्हणाले,‘‘मिरवणुकीतील डीजे व प्रखर दिव्यांचा रुग्णवाहिकांना काही प्रमाणात त्रास होत होता. परंतु प्रशासन, पोलीस व मंडळांनी पुष्कळ सहकार्यही केले. रुग्णवाहिका आल्यावर ढोल पथके व डॉल्बीही थांबत होते, त्यामुळे मदत झाली.’’

समुपदेशक एकत्र

सहा समुपदेशन संस्थांचे शंभर समुपदेशक जनजागृतीसाठी कसबा गणपतीच्या पालखीबरोबर मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांनी फलक प्रदर्शित करून, तसेच मूकनाटय़ांच्या माध्यमातून मानसिक व कौटुंबिक समस्या व त्यावरील उपाय समोर ठेवले. ‘आम्ही सारे समुपदेशक’ या नावाने हा गट पुढेही कार्यरत राहणार असल्याचे डॉ. भरत देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आजवर समस्या मांडल्या जात होत्या, परंतु समुपदेशन हा विषय स्वतंत्रपणे आला नव्हता. व्यसनधीनता  समूहाच्या असतात. पुण्यात समुपदेशक संस्था व समुपदेशकही मोठय़ा संख्येने आहेत.