पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गणिताचा पाया पक्का करण्यासाठी त्यांना पाढे शिकवले जाणार असून, त्यासाठीच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सव्वा कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी निधी उपलब्ध नसल्याने, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण करून ही खरेदी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील एका माजी मंत्र्याने केलेल्या शिफारशीनंतर महापालिकेने एका खासगी संस्थेकडून हे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची तयारी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी (१० जानेवारी) होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ‘महापालिका शाळांमधील मुलांचे गणित कच्चे आहे. करोनानंतर यामध्ये अधिकच वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांचा गणिताचा पाया चांगला करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे,’ असे महापालिकेचे म्हणणे आहे.

हेही वाचा…शिवसेना कोणाची ? भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांची स्पष्ट भूमिका म्हणाले…!

मुलांचे गणित पक्के व्हावे, यासाठी एका संस्थेने पाढे पाठ करणारे साहित्य तयार केले आहे. या साहित्याला राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) मान्यता दिली असून, राज्यातील निवडक शाळांमध्ये पथदर्शी स्वरूपात त्याची अंमलबजावणी करण्यास हरकत नसल्याची शिफारसही ‘एससीईआरटी’ने केली असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, या संस्थेने पुणे महापालिकेला पत्र दिले होते. तसेच, राज्य शासनाच्या एका माजी मंत्र्याकडे याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यामुळे राज्य शासनाकडूनही महापालिकेला याची शिफारस करणारे पत्र मिळाले होते. संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, या प्रणालीच्या वापरासाठी शैक्षणिक साहित्याचा दर प्रति ५० विद्यार्थ्यांसाठी एका संचाची किंमत ७,६७० रुपये आहे. त्यानुसार, पहिली ते आठवीच्या अंदाजे ८८ हजार विद्यार्थ्यांसाठी १७६० संच लागणार असल्याने, ते संच खरेदी करण्यासाठी १ कोटी ३४ लाख ९९ हजार २०० रुपये खर्च येणार आहे.

आता या उपक्रमासाठी चालू वर्षाच्या, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात तरतूद नाही. त्यामुळे हा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या आणि बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत मुलांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते, त्या रकमेतून हा निधी वर्गीकरणाद्वारे दिला जावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

हेही वाचा…शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश अन् भाजपमध्ये बँनरबाजी ! पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला फ्लेक्स लावून नाराजी व्यक्त

यानिमित्ताने निर्माण होणारे प्रश्न

गणित, विज्ञान हे विषय शिकविण्यासाठी महापालिकेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांच्या पगारावर दर महिन्याला महापालिका मोठा खर्च करते. या शिक्षकांनी मुलांकडून वेगवेगळे उपक्रमांच्या माध्यमातून या विषयांचा अभ्यास पक्का करून घेणे अपेक्षीत आहे. मात्र, स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवताना करोनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले असून, मुलांना मुलभूत आकडेमोड करता येत नाही. वाचनही येत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. यामुळे एका प्रकारे महापालिकेकडून आपल्याच शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 25 crores is proposed for purchasing educational materials to strengthen math foundation in pmc schools pune print news ccm 82 sud 02