पुणे : मिळकतकर भरण्यास मिळकतधारकांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची विविध बक्षीसे देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही एक कोटी रुपयांची बक्षिसे कागदावरच राहिली आहेत. बक्षिसापोटीच्या वस्तूंची खरेदी न झाल्याने बक्षिसांचे वितरण करण्यात आलेले नाही. दरम्यान, दसऱ्यापर्यंत वस्तूंचे वितरण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने मिळकतकर लाॅटरी योजना जाहीर केली होती. त्यामध्ये पेट्रोल कार, ई-बाईक, मोबाईल संच आणि लॅपटाॅप अशा वस्तूंचा समावेश होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली होती.
हेही वाचा – पुणे : ससूनमधील कैद्यांच्या उपचार कक्षाची आता होणार अचानक तपासणी; पोलीस आयुक्तांचे आदेश
वार्षिक कर २५ हजार रुपयांपेक्षा कमी कर असलेल्या दोघांना प्रत्येकी एक-एक तर २५ हजारांपेक्षा जास्त पण ५० हजारांपेक्षा कमी असणाऱ्या एका मिळकतधारकाला एक पेट्रोल कार जाहीर करण्यात आली होती. याच प्रकारातील सहा मिळकतधारकांना सहा ई-बाईक तर २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत कर भरणाऱ्या तिघांना अशा एकूण नऊ ई-बाईक देण्यात आल्या. तसेच २५ हजारांपर्यंत कर भरणाऱ्या सहा मिळकतधारकांना सहा मोबाईल संच तर २५ ते ५० हजारांपर्यंत कर भरणाऱ्या तीन मिळकतधारकांना मोबाईल संच देण्यात आला. एकूण पाच मिळकतधारकांना पेट्रोल कार, पंधरा मिळकतधारकांना ई-बाईक, पंधरा मिळकतधारकांना मोबाईल संच, दहा मिळकतधारकांना लॅपटाॅप देण्याचे जाहीर करण्यात आले होते. लाॅटरीनंतरही बक्षिसे देण्यात न आल्याने महापालिकेवर टीका करण्यात आली होती. मात्र, बक्षिसांच्या गाड्या आणि अन्य वस्तूंची खरेदी झाली नसल्याने गणेशोत्सवात बक्षिसे दिली जातील, असे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवानंतरही विजेत्यांना बक्षिसाच्या रकमेची प्रतीक्षा आहे.
वास्तविक बक्षिसांपोटी देण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र, काही लहान वस्तूंची खरेदी महापालिकेकडून करण्यात आली आहे. ई बाईक आणि पेट्रोल कारची खरेदी रखडली आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. सध्या वाहन विभागाने गाड्या खरेदीसाठीचे दरपत्रक मागविले आहे. मात्र, दरपत्रकात तफावत असल्याने खरेदी रखडली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करणार ‘डीपीसी’च्या निधीची ‘वाटणी’?
कर आकारणी विभागाने प्रशासकीय मान्यता आणि निधी वाहन विभागाला उपलब्ध करून दिला हे. त्यानुसार ही खरेदी झाली असून, येत्या काही दिवसांत गाड्या महापालिकेला प्राप्त होणार आहेत. भांडार विभागाची खरेदीही पूर्ण झाली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. नवरात्रीत बक्षिसांच्या वस्तूंचे वाटप करण्यात येईल. – अजित देशमुख, प्रमुख कर आकारणी आणि कर संकलन विभाग