पिंपरी पालिकेच्या १८ माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टक्केवारीनुसार आर्थिक बक्षिसे दिली जाणार आहेत. गेल्या वेळी झालेल्या तांत्रिक अडचणींचा संदर्भ देत या योजनेत काहीशी सुधारणा करण्यात आली आहे. यंदा ९० टक्क्य़ाच्या पुढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक एक लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
आयुक्त राजीव जाधव यांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला, त्यास समितीने मान्यता दिली. २०१४-१५ मध्ये ८९ विद्यार्थ्यांना एकूण ३४ लाख रूपयांची बक्षिसे वाटण्यात आली होती. याशिवाय, अंध व अपंग विद्यार्थ्यांना देखील या योजनेत सहभागी करून घेण्यात आले आणि चार अपंग व नऊ अंध विद्यार्थ्यांना साडेसहा लाख रूपये वाटण्यात आले. यापूर्वी, ८० ते ८५.९९ टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार, ८६ ते ९०.९९ टक्क्य़ांसाठी ५० हजार आणि ९१ टक्क्य़ांच्या पुढे एक लाख रूपये देण्यात येत होते. बक्षिसे देताना गेल्या वर्षी काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. टक्क्य़ांच्या स्पर्धेमुळे काही विद्यार्थ्यांना बक्षिसापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून या योजनेत आयुक्तांनी काहीसा बदल केला. त्यानुसार, आता ८० ते ८४.९९ टक्के असल्यास २५ हजार रूपये, ८५ ते ८९.९९ टक्के असल्यास ५० हजार आणि ९० ते त्यापुढील टक्के असल्यास एक लाख रूपये देण्यात येणार आहेत.