शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठी आतापर्यंत १ लाख ३७ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांसाठी १७ मार्च अंतिम मुदत असल्याने अर्जसंख्या अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत आठ हजार ८२७ शाळांनी नोंदणी केली आहे.
हेही वाचा >>> लहान मुलांची भांडणे, दोन कुटुंबात हाणामारी; लोणीकंद पोलिसांकडून १५ जणांवर गुन्हा
त्यात एक लाख १ हजार ९२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू करण्यात आली. त्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत २ लाख ८२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे १७ मार्चपर्यंत अर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया, जिल्हानिहाय शाळा, उपलब्ध जागा, अर्ज प्रक्रिया आदी माहिती https://www.student.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.