एका वर एक फ्री, अमुक वस्तू घ्या. त्यावर तमुक फ्री. अशा प्रकारच्या जाहिराती आतापर्यंत साबण, शाम्पू, कपडे अशा वस्तूंच्या विक्रीमध्ये दिसत होत्या. मात्र, आता ‘आमच्याकडे प्रवेश घ्या.. लॅपटॉप फ्री किंवा टॅबलेट फ्री!’ एका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या परदेशी विद्यापीठाची पदवी फ्री अशा प्रकारच्या जाहिराती चक्क व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था करत आहेत.
काही वर्षांपूर्वी संस्थेच्या प्लेसमेंट, त्या संस्थेतील शिक्षकांची ओळख, संस्थेत शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती अशा मुद्दे शिक्षणसंस्थांच्या माहिती पुस्तकांमध्ये किंवा संकेतस्थळांवर दिसत होते. मात्र आता राज्यात ‘प्रवेश घ्या.. लॅपटॉप फ्री मिळवा’ किंवा ‘प्रवेश घ्या आणि परदेशवारी करा’ अशा प्रकारच्या ‘एका वर एक फ्री’ च्या जाहिराती व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षणसंस्था करत आहेत. काही संस्थांनी तर एका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या आणि परदेशी विद्यापीठाच्या प्रमाणपत्रासह एक पदवी मोफत मिळवा अशा जाहिरातीही सुरू केल्या आहेत. कोणत्याही प्रवेश परीक्षेची अट न ठेवताही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या संस्थांना विद्यार्थी मिळत नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षणसंस्थांनी हा नवा मार्ग शोधला आहे. क्लासिफाइड जाहिराती देणाऱ्या संकेतस्थळांवर महाविद्यालयांच्या अशा प्रकारच्या जाहिरातींचे पेव फुटले आहे. याशिवाय टेलेमार्केटिंगच्या माध्यमातूनही आणि रस्त्यांवर सिग्नलला उघडपणे पत्रके वाटून ही जाहिरातबाजी सुरू आहे.
दूरशिक्षणाद्वारे एमबीएचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था यामध्ये आघाडीवर आहेत. यातील बहुतेक शिक्षणसंस्थांमध्ये उत्तरेकडील एखाद्या विद्यापीठाची संलग्नता असते. शैक्षणिक समुपदेशन संस्थेच्या नावाखाली या संस्थांनी राज्यामध्ये एजन्सीज सुरू केल्या आहेत. या अमुक दहा संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांना १० हजार रुपये रोख किंवा टॅबलेट फ्री अशा जाहिराती करून विद्यार्थ्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न या एजन्सीज करत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन चौकशी करताना किंवा या एजन्सीजकडे महाविद्यालयांची चौकशी करताना विद्यार्थीही लॅपटॉप मिळणार का, परदेशी स्टडी टूर आहे का, अशा चौकशी करत असल्याचे एका एजन्सीने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा