पुणे : एकीकडे राज्य सरकारकडून गोविंदांना खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली असताना, दुसरीकडे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ या परीक्षेतून निवड झालेल्या १ हजार १४३ उमेदवारांना साडेतीन वर्षांनंतरही नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे या उमेदवारांमध्ये अस्वस्थता असून, तातडीने नियुक्ती मिळण्यासाठी या उमेदवारांकडून मंगळवारी (२३ ऑगस्ट) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.

दहीहंडीच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्याची, गोविंदांना खेळाडू आरक्षणातून सरकारी नोकरी देण्याची, प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी केली. या निर्णयाविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच आंदोलनांद्वारे या निर्णयाला विरोधही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ या परीक्षेतून ‘गट अ’ आणि ‘गट ब’ (राजपत्रित) पदांसाठी १ हजार १४३ उमेदवारांची निवड होऊन साडेतीन वर्षांपासून उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या लालफितीच्या कारभाराचा या उमेदवारांना फटका सहन करावा लागत आहे.

निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार विनायक देसाई, आकाश परदेशी, निखिल पवार, सागर देसले म्हणाले, की सर्व पातळ्यांवर निवेदने देऊन झाली, विनंती करून झाली. मात्र सरकारने कायमच दुर्लक्ष केले. मात्र आता सहन करण्यापलिकडे परिस्थिती गेल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवड झालेले उमेदवार प्रातिनिधिक स्वरुपात लोटांगण घालून तत्काळ नियुक्ती मिळण्यासाठी भीक मागणार आहोत.