पुणे : रेल्वे प्रवाशांकडून विनाकारण गाडीतील संकटकालीन साखळी ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अशा घटनांमुळे १ हजार ७५ गाड्यांना विलंब झाला. केवळ नोव्हेंबर महिन्याचा विचार करता साखळी खेचण्याच्या घटनांमुळे १९७ गाड्यांना उशीर झाला. मागील महिन्यात सरासरी १० मिनिटांचा विलंब या गाड्यांना झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत मध्य रेल्वेने ७९३ व्यक्तींविरुद्ध विनाकारण साखळी खेचण्याचे गुन्हे नोंदवले. त्यांच्याकडून २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. विनाकारण साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १ हजार ७५ गाड्या विलंबाने धावल्या. त्यात मुंबई विभागातील ३४४ गाड्या, भुसावळ विभागात ३५५ गाड्या, नागपूर विभागात २४१ गाड्या, पुणे विभागात ९६ गाड्या विभाग आणि सोलापूर विभागात ३९ गाड्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-‘ससून’मध्ये मोठा गैरव्यवहार! वाहतनळ कंत्राटदाराने पैसे बुडविले

विनाकारण साखळी खेचण्याच्या घटनांमुळे गाड्यांच्या वक्तशीरपणात ८.२९ टक्के घट झाली आहे. केवळ नोव्हेंबर महिन्यात साखळी खेचण्याच्या घटनांमुळे १९७ गाड्या उशिराने धावल्या. या गाड्यांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला. त्यात मुंबई विभागात ७३, भुसावळ विभागात ५३, नागपूर विभागात ३४, पुणे विभागात ३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांचा समावेश आहे. मुंबई साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज १२ उपनगरी गाड्यांना उशीर होतो आणि त्यांच्या वक्तशीरपणात १६.५० टक्के घट होते. पुणे विभागात पुणे स्थानकावर अशा घटना वारंवार घडत आहेत.

पुणे विभागात या गाड्यांना सर्वाधिक फटका

-वास्को – निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस
-निजामुद्दीन – वास्को गोवा एक्स्प्रेस
-कोईमतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
-पुणे – जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस

विनाकारण साखळी ओढण्याचे तोटे

-गाडी थांबवण्यात आल्याने तिला पुढे पोहोचण्यास विलंब
-एक गाडी थांबल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्याही उशिराने धावतात
-एका प्रवाशासाठी गाडीतील शेकडो प्रवाशांची गैरसोय
-रेल्वेच्या यंत्रणांना नाहक त्रास होऊन कामकाजावर परिणाम

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 thousand 75 trains delayed due to chain pulling pune print news stj 05 mrj