दिवाळीतील फराळविक्रीची पुण्यातील उलाढाल वाढली असून, ती तब्बल दहा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बदलती जीवनशैली, दर्जेदार पदार्थाची उपलब्धता आणि पुणेकरांची क्रयशक्ती वाढल्यामुळे हा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील धावपळीचे जीवन आणि घरातील सर्वच व्यक्ती कामांमुळे बाहेर असणे यामुळे आता हे पदार्थ बाजारातून विकत घेऊन दिवाळी साजरी केली जाते. तसेच या दिवसांत नातेवाइकांनाही पाहुणचार म्हणूनही हे पदार्थ पाठवले जाण्याची प्रथा आपल्याकडे आहे. शहरात खास दिवाळीत खाद्य पदार्थ विकणारी दुकाने सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी तसे स्टॉलही उभे राहिले आहेत. दिवाळीसाठी हवे ते पदार्थ तुलनेने रास्त दरात आणि अगदी काही वेळात उपलब्ध होत असल्यानेही नागरिकांकडून या पदार्थाची मागणी वाढली आहे. इतकेच नव्हे तर हे पदार्थ गोड, तिखट, लो कॅलरी, शुगर फ्री आणि विविध चवींमध्ये असे विविध प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याकडे नागरिकांचा ओढा वाढला असून, ही उलाढाल तब्बल १० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. परदेशातही पुण्यातून सुमारे १ कोटी रुपयांचा फराळ जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सरपोतदार यांनी दिली.
खास दिवाळीनिमित्त खाद्य पदार्थाची विक्री करणारी २५ दुकाने सुरू झाली आहेत. विदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीय बांधवांकडूनही या पदार्थाना दिवाळीत मोठी मागणी होत आहे. त्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे या शहरांतूनही गेल्या काही वर्षांत पुण्यातील दिवाळी खाद्य पदार्थाना मागणी वाढली आहे. अमेरिका, लंडन, फ्रान्स, दुबई, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर या देशांमधून हातवळीचे मोतीचूर लाडू आणि अनारसे, चकली, करंजी या पदार्थाना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.
‘‘दिवाळीच्या फराळाला गेल्या वर्षीपेक्षा यंदा मोठी मागणी आहे. कामामुळे आजकाल घरी पदार्थ बनवले जात नाहीत. त्यामुळे बाजारात तयार असणाऱ्या पदार्थाना मोठी मागणी आहे. लोकांना ताजा आणि चांगला माल पाहिजे असतो तोही कमी वेळेत. तसेच लो कॅलरी आणि शुगर फ्री पदार्थाची मागणी यंदा १० टक्क्यांनी वाढली आहे.’’
– अशोक सरपोतदार, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष / सरपोतदार केटर्सचे प्रमुख
‘‘निवडणूक काळात विक्रीत थोडा फरक जाणवला आहे. पण आता लोक येत असून मोतीचूर लाडू, चकली, चिवडा, करंजी या पदार्थाना मोठी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आतापर्यंत १ हजार किलो पदार्थाची विक्री झाली आहे. अजून २ हजार किलोपर्यंतही विक्री जाईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी मागणी आहे. दोन आठवडय़ांपासून विक्री सुरू झाली आहे.’’
– संजय परांजपे, वंृदावन स्टोअर्स