लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: तलाठी भरतीसाठी यंदा विक्रमी १० लाख ४० हजार ७१३ अर्ज, परीक्षेसाठी शारीरिक विकलांग आणि महिला उमेदवारांना दिलेले प्राधान्य आणि अनेक उमेदवारांनी राज्यातील ठरावीकच जिल्हे परीक्षा देण्यासाठी निवडले आहेत. या व अशा विविध कारणांमुळे तलाठी भरती परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्र मिळाले आहे, अशी स्पष्टोक्ती भूमी अभिलेख विभागाकडून सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे.

अनेक उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या केंद्रापेक्षा दूरचे केंद्र मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली.

अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते याबाबत म्हणाले, की परीक्षेसाठी १० लाख ४० हजार ७१३ अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्र देताना शारीरिक विकलांग आणि महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले होते. तब्बल एक लाख ३४ हजार उमेदवारांनी परीक्षा देण्यासाठी पुणे जिल्हा निवडला होता. त्यांपैकी एक लाख १४ हजार उमेदवारांना पुणे जिल्ह्यातील केंद्र देण्यात आले आहे.

हेही वाचा… जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

उर्वरित उमेदवारांना मुंबई आणि पुण्याच्या आसपासचे जिल्हे देण्यात आले आहेत. परीक्षा जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांना २०० किलोमीटरच्या परिसरात परीक्षा केंद्र देण्यात येणार असल्याची कल्पना दिली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. तसेच सायबर सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळालेल्या केंद्रांनाच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे काही जणांना २०० किमीपेक्षाही दूरचे केंद्र मिळाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांनी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा निवडला आहे, असेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे काही उमेदवारांनीच दूरचे केंद्र निवडले, तर काही उमेदवारांना वरील अडचणींमुळे दूरचे केंद्र देण्यात आले आहे, असेही रायते म्हणाले.

हेही वाचा… ऐन पावसाळ्यात उजनी धरण रिकामे, नीरा नदी कोरडी! इंदापूर तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर

दरम्यान, उमेदवारांनी परीक्षेआधी दीड तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशिका टप्प्याटप्प्याने भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असेही अतिरिक्त जमाबंदी आयुक्त रायते यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakh 40 thousand applications for talathi post in maharashtra pune print news psg 17 dvr