राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार राज्य मंडळाने वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>>“..उलट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला”, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
करोना काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अधिकचा वेळ, शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा करोना पूर्व काळानुसार परीक्षा घेतल्या जाणार असल्याने राज्य मंडळाने गेल्यावर्षीच्या सवलती रद्द केल्या. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी दिली जाणारी दहा मिनिटे रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. तसेच परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक, विद्यार्थ्यांची झडती आदी उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या वेळेपूर्वीची दहा मिनिटे रद्द करण्याच्या राज्य मंडळाच्या निर्णयानंतर नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर आता वाढीव दहा मिनिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>>बीबीसी कार्यालयावरील छाप्याचे पुण्यात पडसाद; केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहा मिनिटे रद्द करण्याच्या निर्णयानंतर पालक-विद्यार्थ्यांकडून शासनाला निवेदने देण्यात आली होती. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून दिली जाणार आहे.