पुण्यातील कोंढवा येथील कॅलम शाळेतील दहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मैदानावर खेळताना मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. फरहान फारुख हवेवाला असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याला ह्रदयासंबंधीचा आजार होता, असे समजते. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान फारुख हवेवाला हा कॅलम हायस्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत होता. सकाळी सव्वा आठला शाळा भरते. फरहान सकाळी साडे सातच्या सुमारास शाळेत पोहोचला. शाळा भरण्यापूर्वी फरहान आणि त्याचे काही मित्र शाळेच्या मैदानात खेळत होते. या दरम्यान फरहान भोवळ येऊन कोसळला. फरहानच्या मित्रांनी याची माहिती शाळेच्या शिक्षकांना दिली. त्यांनी तातडीने फरहानला रुग्णालयात भरती केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून प्राथमिक तपासात फरहानच्या मृत्यूमध्ये संशयास्पद प्रकार आढळलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. फरहानला ह्रदयासंबंधीचा आजार होता, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. फरहानचे वडील फिरदोस फरोज हवेवाला (वय ५२) आणि आई फरीदा (५०) हे पुण्यात शिकवणी घेतात. त्यांना एक लहान मुलगी देखील आहे.