केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि राज्यसेवा परीक्षेच्या (एमपीएससी) तयारीचे सर्वात मोठे केंद्र अशी पुण्याची आणखी एक ओळख बनली आहे. त्यामुळे पुण्यनगरीच्या उत्पन्नातही भर पडली असून, बाहेरगावाहून फक्त या परीक्षांच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून पुण्याला वर्षांकाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे या उत्पन्नात वेगाने वाढ होत असून, गेल्या तीनच वर्षांमध्ये त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांपैकी साधारण एक तृतीयांश उमेदवार हे पुण्याच्या केंद्राचे असतात. त्यात बाहेरगावाहून पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या परीक्षांच्या तयारासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पुण्याच्या जवळच्या जिल्ह्य़ांमधून येणाऱ्या उमेदवारांबरोबरच मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्य़ांमधून इथे येणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे निरीक्षण क्लासचालक नोंदवतात. बाहेरून पुण्यात येणाऱ्या उमेदवारांमध्ये दोन प्रकार आहेत. पुण्यामध्ये येऊन एखादा अभ्यासक्रम करताना परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि फक्त स्पर्धा परीक्षा देण्याच्या उद्देशानेच पुण्यामध्ये येणारे उमेदवार. यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षांसाठी बाहेरून पुण्यामध्ये येणाऱ्या उमेदवारांची संख्या ही साधारण २० हजारांच्या घरात आहे.
या उमेदवारांचे राहणे, जेवण, क्लासचे शुल्क, अभ्यासाचे साहित्य, अभ्यासिकेचा खर्च यांमधून पुण्याला सध्या ढोबळमानाने वर्षांकाठी ८० ते १०० कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. पुण्यातील बहुतेक प्रसिद्ध क्लास, अभ्यासिका या पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एकवटलेल्या आहेत. उमेदवारांचा ओढाही या संस्थांकडेच अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एमपीएससी, यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर आधारलेली मोठी बाजारपेठच उभी राहिली आहे. परीक्षेची तयारी करून घेणारे क्लास हा अर्थातच या सगळ्यामधील मुख्य व्यवयाय आहे. बहुतेक क्लासमध्ये ३० हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यत शुल्क आकारले जाते. क्लासला पुरक असा अभ्यासिकांचा दुसरा व्यवसाय आहे. वर्षभराचे सदस्यत्व, परीक्षेच्या काळापुरते सदस्यत्व असे पर्याय अभ्यासिकांमध्ये उपलब्ध आहेत. दिवसाला ८ ते १२ तास बसता येईल अशा अभ्यासिकाही पुण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आहेत. अभ्यास साहित्याचीही मोठी बाजारपेठ पुण्यात आहे. परीक्षेच्या तयारीसाठी आलेले उमेदवार पुण्यामध्ये कॉटबेसीसवर राहतात. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी भाडय़ाने जागा देणे, रोजची मेस, सकाळी आणि संध्याकाळी क्लासच्या परिसरामध्ये नाष्टा पुरवणे असे अनेक व्यवसाय सध्या पुण्यामध्ये आहेत.
याबाबत पृथ्वीचे विश्वनाथ पाटील यांनी सांगितले, ‘‘गेल्या दहा वर्षांमध्ये पुण्यामध्ये येऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. पुण्याबाहेरही एमपीएसीची तयारी करून घेणारे क्लासेस आहेत. मात्र, यूपीएससीची तयारी आणि एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये येण्याकडे उमेदवारांचा ओढा आहे. यातील बहुतेक उमेदवारांचे घरचे उत्पन्न हे शेतीवर आधारित आहे.’’
क्लासेसची वाढती संख्या
परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासेसना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे अर्थातच क्लासेसच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पूर्वी हे क्लासेस एकवटलेले होते, ते आता उपनगरांमध्येही दिसू लागले आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये सध्या १५ वर्षभर चालणारे मोठे क्लास आहेत, तर ३५ ते ४० च्या जवळपास क्लास उपनगरांमध्ये आहेत. उपनगरांमध्ये पूर्णवेळ चालणाऱ्या क्लासेसपेक्षाही अर्धवेळाच्या किंवा सायंकाळच्या क्लासेसचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय परीक्षेच्या आधी तीन महिने, परीक्षेपुरते चालवल्या जाणाऱ्या क्लासेसची तर गणतीच नाही. परीक्षेपुरत्याच सुरू झालेल्या क्लासेसचे शुल्क हे ३ ते ५ हजार रुपयांच्या घरात असते. त्यामुळे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून या सराव वर्गाना किंवा क्लासेसना प्राधान्य दिले जाते असे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सांगितले.
बाहेरगावचा एक उमेदवार पुण्यामध्ये किती खर्च करतो?
बाहेरगावाहून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आलेला एक उमेदवार पुण्यामध्ये महिन्याला ढोबळमानाने ९ हजार तर वर्षांला १ लाख ९ हजार रुपये खर्च करतो.
राहण्यासाठी – महिन्याला २००० रुपये- वर्षांला २४ हजार रुपये
जेवण – महिन्याला – १६०० रुपये आणि वर्षांला १९ हजार २००
नाष्टा – महिन्याला साधारण ७०० रुपये आणि वर्षांला ८ हजार ४०० रुपये
अभ्यासिका – महिन्याला २५० रुपये आणि वर्षांला ३००० रुपये
एमपीएसीचा क्लास – वर्षांला साधारण ५० हजार रुपये किंवा यूपीएससीचा क्लास – वर्षांला साधारण ८० हजार रुपये
अभ्यासाचे साहित्य – वर्षांला ५ हजार रुपये
दोन क्लासचा ट्रेंड
सध्या दोन क्लासेस लावण्याचा ट्रेंड स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये दिसून येतो. एखाद्या विषयासाठी वेगळा क्लास आणि संपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी दुसरा क्लास लावण्याकडे यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा कल आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये राहणे परवडत नसल्यामुळे उपनगरांमध्ये राहणारे उमेदवार वाढत आहेत. हे उमेदवार दिवसभर पुण्यातील एखाद्या मोठय़ा क्लासमध्ये तयारी करतात, तर आपल्या घराजवळ असलेल्या क्लासमध्ये सायंकाळच्या वर्गामध्ये तयारी करत असल्याचे दिसून येते.
तयारीसाठी पुणेच का?
पुण्याबाहेर इतर जिल्ह्य़ामध्येही स्पर्धा परीक्षांचे क्लासेस वाढत आहेत. तरीही उमेदवारांचा पुण्याकडे ओढा का याबाबत क्लासचालक आणि उमेदवार सांगतात.
‘‘गावापेक्षा पुण्यामध्ये या परीक्षांचे अधिक चांगले मार्गदर्शन मिळते. या परीक्षांच्या तयारीसाठीचे वातावरण पुण्यामध्ये आहे. क्लासबरोबरच व्याख्याने, चर्चा यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातूनही तयारी होत असते आणि ते पुण्यातच असतात. गावाकडे क्लासेस सुरू झाले आहेत. मात्र, बाकीचे साहित्य मिळत नाही. पुण्यामध्ये राहणे हे गावापेक्षा अधिक खर्चीक आहे. पुण्यामध्ये क्लासचे शुल्क आणि अभ्याससाहित्या व्यतिरिक्त महिन्याला साधारण ६ हजार रुपये खर्च येतो.’’
– ओम चाळके, (मूळ गाव बीड)
‘‘पुण्यामध्ये बाहेरून येणारे उमेदवार मोठय़ा प्रमाणावर आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यामध्ये मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा दर्जा हा नक्कीच उत्तम आहे. पूर्व परीक्षेचे मार्गदर्शन इतर ठिकाणी मिळू शकते. मात्र, मुख्य परीक्षेसाठी उमेदवार पुण्यालाच प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. पुण्यामध्ये गेली अनेक वर्षे या परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारे वर्ग आहेत. त्यामुळे परीक्षांच्या तयारीसाठीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्लासेसच्या जोडीला अभ्यास साहित्य आणि सुविधा पुण्यामध्ये अधिक आणि चांगल्या दर्जाच्या आहेत.’’
– तुकाराम जाधव, संचालक ‘द युनिक अॅकॅडमी

Story img Loader