पुणे : प्रभू श्रीरामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे ठळक प्रसंग… ६० कलाकार… ३०० किलो रांगोळी… ४० तासांचा कालावधी… आणि जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्रीरामाची १०० फूट भव्य रंगावली नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत साकारण्यात आली आहे. ‘श्रीराम रंगी रंगले’ उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष करताना रामचरित्रावर अखंड गायन – भजन – नृत्य सादरीकरण, रामावरील चित्रप्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन आणि श्रीराम खिचडी प्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचे संयोजन केले आहे. तर, पूर्व संघ प्रचारक सुनील देवधर यांनी आयोजन केले आहे. संस्कार भारती आणि श्रीरंग कलादर्पणच्या कलाकारांनी प्रभू श्रीरामाची रंगावली ७ हजार चौरस फूट आकारात साकारली आहे. यामध्ये रामायणातील ७ प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. तसेच १४ भाषांमध्ये ४२ वेळा विविध पद्धतीने जय श्रीराम असे रेखाटण्यात आले आहे.
हेही वाचा – “एक किंवा दोन अपत्यावर थांबा, नाही तर ब्रह्मदेव…”; अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी
रामचरित्रावर सांस्कृतिक कार्यक्रम, श्री रामायणावरील १२५ चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसाद वाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती-पुस्तके-गौ साहित्याचे प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आर्ट इंडिया फाऊंडेशनतर्फे ‘खुला आसमान’ श्री रामायणावर आधारित १२५ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून काढलेल्या २ हजार चित्रांमधील १२५ सर्वोत्कृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन ७०० शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.