पुणे : जिल्ह्याने गेल्या आर्थिक वर्षात १०० टक्के निधी खर्चाचे उद्दिष्ट गाठले असून, याद्वारे जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे मार्गी लागणार आहेत. सन २०२३-२४ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत  सर्वसाधारण योजनेच्या  विकास आराखड्यासाठी गतवर्षापेक्षा १३० कोटींची भरीव वाढ मिळविण्यात आली असून आता हा आराखडा १००५ कोटी रुपयांचा असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण रस्त्यांसाठी ९३ कोटी रुपये खर्च होणार असून, याद्वारे २०० कि.मी.च्या ग्रामीण रस्त्यांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच ४१ कोटी ५२ लाख रुपये खर्चाच्या १०० किलोमीटर इतर जिल्हा मार्गाचेही नियोजन आहे.

ग्रामीण भागातील सुविधांवरही लक्ष देण्यात आले असून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकरिता २३६ कोटींपेक्षा अधिकचा निधी हा ग्रामपंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते स्मशानभूमी सुधारणा, घाट सुधारणा, गटर बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम आदी कामांकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी १७ नगरपालिका/नगरपंचायतींना १०० कोटींचा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा – Pune Sasoon Hospital :”एकनाथ शिंदेंचा पीए बोलतो आहे” ससून रूग्णालयाच्या डीन यांना फेक कॉल

लघू पाटबंधारे व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी २५ कोटी रुपये देण्यात आल्याने ग्रामीण भागातील सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे. अल्पमुदत पीक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ६० हजार २५४ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ९१ लाख रुपये देण्यात आले.

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यादृष्टीने जिल्हापरिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकरिता ३६ कोटी ५० लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेतील संगणक प्रयोग शाळा, डिजिटल टिचिंग डिव्हाईस, डिजिटल वर्ग खोली यासाठी ४ कोटी ५० लाखांचा निधी देण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील शाळांकरितादेखील प्रत्येकी ४ कोटी ५० लाख रुपये ॲस्ट्रॉनॉमी लॅब व सायन्स लॅबकरिता देण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : पैशासाठी पत्नीची विक्री; मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले

युवकांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी यासाठी १६ कोटी रुपये व्यायामशाळा साहित्य, ओपन जिम, क्रीडा साहित्य तसेच कबड्डी, कुस्ती आणि खो-खो मॅट खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्री चतुशृंगी देवस्थान येथील विकासकामाकरिता दीड कोटी, जंगली महाराज देवस्थान येथील विकासकामांसाठी ६० लाख, ओंकारेश्वर व कसबा गणपतीसाठी  प्रत्येकी ४० लाख आणि पाषाण तलावाच्या सुशोभिकरणाकरिता २० लाखांचा निधी देण्यात आला आहे.

पुणे शहरातील पोलीस वसाहतींच्या सुधारणाकरिता दोन कोटी रुपये, कोथरुड, दत्तवाडी पोलीस स्टेशन दुरुस्तीसाठी दीड कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांकरिता वाहन खरेदीकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत.

उत्तम नियोजनाद्वारे १०० टक्के निधी वितरीत

जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत प्राप्त १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ८७५ कोटी रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनूसूचित जाती उपयोजना) साठी १२८ कोटी ९८ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम) साठी प्राप्त ५४  कोटी १० लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 percent fund expenditure of pune district annual plan pune print news psg 17 ssb