कसबा पेठेतील शंभर वर्षे जुन्या गालीम वाडय़ाला शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत वाडय़ातील पाच ते सहा खोल्या जळाल्या आहेत. आगीच्या वेळी आत अडकलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह नऊजणांची नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली. त्याचबरोबर चौदा गॅस सिलेंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तीन अग्निशामक गाडय़ा आणि तीस जवांनाच्या पथकाने चाळीस मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे.
फडके हौदाजवळील ४४५ कसबा पेठ येथे दुमजली गालीम वाडा आहे. या वाडय़ाचे मालक अतुल आबासाहेब गालीम असून या ठिकाणी तेरा ते चौदा भाडेकरू राहतात. येथे राहणारे बहुतांश लोक हे नोकरीला असल्यामुळे बाहेर गेले होते, घरात काही ज्येष्ठ नागरिक आणि महिला होत्या. सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास जिन्यामध्ये असलेल्या वीजवाहिनीत आवाज आला. सुरुवातीला जिन्यात आग लागली. तळमजल्यावरील रहिवाशी तत्काळ बाहेर आले. मात्र वरील मजल्यावरील आठ ते दहा लोक वाडय़ातच अडकले होते. त्यांना नवदीप तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिडीच्या मदतीने खाली उतरविले.
अग्निशामक दलास आगीची माहिती मिळाल्यानंतर कसबा अग्निशामक केंद्राची पहिला गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीचे स्वरूप पाहून आणखी गाडय़ा पाठवून देण्यास सांगितले. त्यानंतर आणखी दोन अग्निशामक गाडय़ा आणि तीन टँकर घटनास्थळी पोहचले. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत एक ज्येष्ठ नागरिक अडकलेले होते. त्यांना अग्निशामक दलाचे जवान सय्यद यांनी बाहेर काढले. वाडय़ाचा बराचसा भाग हा लाकडाचा असल्यामुळे आग पसरत होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी आल्यानंतर पहिल्यांदा चौदा गॅसचे सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अशी माहिती कसबा अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.

Story img Loader