लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहरात मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारत असतानाच पीएमपीचे सक्षमीकरण करण्यासंदर्भात वीजेवर धावणाऱ्या (ई-बस) एक हजार नव्या बस खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तसा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दिला आहे. त्यानुसार या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश कुमारस्वामी यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शहरात मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गावरील प्रवासी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. त्यातच खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन नव्या उन्नत मार्गिकांनाही राज्याच्या मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. शहरात एकीकडे मेट्रोचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे पीएमपीच्या सक्षमीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
आणखी वाचा-‘बोपदेव घाट’ प्रकरणातील आरोपींकडून मद्य, अमली पदार्थांचे सेवन
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अपुरी आहे. या दोन्ही शहरातील लोकसंख्या आणि प्रवासी लक्षात घेता ताप्यात किमान तीन हजार गाड्यांची आवश्यकता आहे. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून शहराला वीजेवर धावणाऱ्या (ई-बस) ४०० गाड्या प्राप्त झाल्या आहेत. मात्र प्रवाशांचा प्रवास सुखकर, जलद आणि सुरक्षित व्हावा, यासाठी नव्याने एक हजार गाड्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून शहराचा सर्वांगिणक आणि सुनियोजित विकास सुरू झाला आहे. पीएमपीच्या ताफ्यातील संख्या, आवश्यकता आणि भविष्यातील गरज लक्षात घेता एक हजार गाड्या घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासंदर्भात तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय अवजड मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
© The Indian Express (P) Ltd