पुणे : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत. तसेच या नवनियुक्त तलाठ्यांना निवडणूक कामकाजातही सहभागी करून घेतले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप मागविण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तलाठी भरती परीक्षेची गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली.

हेही वाचा…पुण्यात एनआयएची मोठी कारवाई : दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत जप्त

भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली अशा २३ जिल्ह्यांमधील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. दि. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवड समितीकडून आचारसंहिता लागण्यापूर्वी सुमारे एक हजार उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्तिपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जाणार आहेत.

दरम्यान, उर्वरित जिल्ह्यांमधील पेसावगळता इतर उमेदवारांची गुणवत्तायादी जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता काळात निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी सुरू राहणार आहे. गरज पडल्यास नवनियुक्त तलाठ्यांना निवडणूकविषयक कामकाजात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

हेही वाचा…गोष्ट पुण्याची भाग – ११६ : पेशवेकालीन इतिहास आणि वासुदेव फडकेंचा सहवास लाभलेलं ‘लक्ष्मी नृसिंह मंदिर’

तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्तिपत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील. – सरिता नरके, प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1000 talathi appointments made prior to code of conduct election duties can be give to new recruits pune print news psg 17 psg