तुम्ही एखाद्या शासकीय कार्यालयात कामासाठी गेलात आणि त्या ठिकाणच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास तुम्हाला थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तत्काळ फोन करून तक्रार करता येणार आहे. त्या फोनसाठी नागरिकांना पैसेसुद्धा पडणार नाहीत. कारण, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणाऱ्यांची माहिती मिळावी आणि नागरिकांनी तक्रारी कराव्यात म्हणून टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी केल्यांतर तुम्हाला तक्रार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.
भारतात लाचखोरीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने १०६४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. त्यानुसार प्रत्येक जण आता या क्रमांकावर लाचखोरीची माहिती देऊ शकेल. संपूर्ण देशात जरी हा एकच क्रमांक असला तरी पोलीस नियंत्रण कक्षाच्या शंभर क्रमांकाप्रमाणेच काम करणार आहे. या क्रमांकाचा प्रत्येक जिल्ह्य़ासाठी नियंत्रण कक्ष असणार आहे. पुणे जिल्ह्य़ात १०६४ टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात फोन लागेल. हा क्रमांक टोल फ्री आहे. आलेल्या फोनची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
याबाबत पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच. व्ही. भट यांनी सांगितले की, संपूर्ण देशासाठी सात दिवसांपूर्वी हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. सध्या या क्रमांकावर चौकशी करणारेच फोन येत आहेत. तक्रारीबाबत नागरिक माहिती घेत आहेत. नागरिकांनी या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली जाईल. तक्रारदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येणे शक्य नसल्यास आवश्यकतेनुसार आमचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन कारवाई करतील. नागरिकांनी या क्रमांकावर फोन करून तक्रार दिल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने मध्यस्थी करणारे एजंट हे शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. त्याचबरोबर आवश्यक असल्यास ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भट यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा