पुणे : मद्यविक्रीची दुकाने सुरू झाल्यानंतर होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रालगत पाचशे मीटरच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्य़ातील १०७ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली आहेत. सध्या प्रतिबंध क्षेत्र वगळता ७८५ दुकाने सुरू आहेत.
राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर शहरासह जिल्ह्य़ातील देशी मद्य, वाइन आणि बिअर अशा १२७६ दुकानांपैकी ८९२ दुकाने सुरू झाली होती. मात्र, प्रतिबंध क्षेत्रामधील नागरिक मद्य खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी प्रतिबंधित क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वेक्षण करून शहरासह जिल्ह्य़ातील १०७ दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे सध्या ७८५ दुकानांमधून मद्यविक्री सुरू आहे.
‘शहरासह जिल्ह्य़ात ५ मेपासून मद्यविक्री दुकाने सुरू झाली होती. त्यामध्ये देशी मद्याची २१६, वाइनची २२७ आणि बिअरच्या ४४९ दुकानांचा समावेश होता. प्रतिबंधित क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरावरील दुकाने बंदचे आदेश दिल्यानंतर १०७ दुकाने बंद केली आहेत. त्यामध्ये देशी मद्याची ३५, वाइनची ३२ आणि बिअरच्या ४० दुकानांचा समावेश आहे. सुरू असलेल्या दुकानदारांनी प्रशासनाच्या सूचना, अटींचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. ही दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत दोन टप्प्यांत सुरू राहतील. तसेच पायी येणाऱ्या ग्राहकांनाच मद्य दिले जात आहे. गर्दी टाळण्यासाठी पास देण्यात येत असून त्यावर तारीख आणि वेळ नमूद केलेली असते. त्यावेळेतच संबंधित ग्राहकांनी मद्य खरेदीसाठी येण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
७८५ दुकाने सुरू
शहरासह जिल्ह्य़ात देशी दारूची २१६ दुकाने असून त्यातील ३५ बंद आहेत, तर १८१ सुरू आहेत. वाइन विक्रीची २२७ दुकाने असून ३२ बंद आहेत, तर १९५ सुरू आहेत, तर बिअर विक्रीची ४४९ दुकाने असून ४० बंद आहेत, तर ४०९ सुरू आहेत. एकूण ८९२ दुकानांपैकी १०७ बंद असून ७८५ सुरू आहेत.