निगडीत उभारणीचे काम पूर्ण; १२ जानेवारीला रंगीत तालीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी पालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे १०७ मीटर उंचीचा खांब उभारण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या १२ जानेवारीला रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) प्रत्यक्षात ध्वजउभारणीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा पालिकेचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सर्वाधिक उंचीचा हा राष्ट्रध्वज आहे, असा दावा पिंपरी पालिकेकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठय़ा प्रमाणात गर्दी जमणाऱ्या प्रमुख भागांपैकी निगडीचा भक्ती-शक्ती चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्पसमूह पालिकेने या ठिकाणी उभारले आहे. पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या या उद्यान परिसरात पालिकेने राष्ट्रध्वज असणारा सर्वाधिक उंचीचा झेंडा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बरेच दिवस काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे. गर्दीचे ठिकाण असल्याने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजनांवर गांभीर्याने काम करण्यात आल्याचा युक्तिवाद पालिकेकडून करण्यात येतो. आजूबाजूला लष्करी परिसर असल्याने संरक्षण खात्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळणे आवश्यक होते. तसे पत्र मिळाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. शहरातील नागरिकांमध्ये या झेंडय़ाविषयी फारच उत्सुकता दिसून येते. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित झाली होती. ज्यामध्ये अशाच उंच खांबावर झेंडा फडकावण्यात येत होता आणि तो पिंपरी-चिंचवडचा असल्याचे त्या संदेशात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात तो शहरातील झेंडा नव्हता. निगडीत झेंडय़ासाठी १०७ मीटरचा खांब बसवण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वज उभारणीच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. त्यानंतर, २६ जानेवारीला समारंभपूर्वक राष्ट्रध्वज उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर पूर्ण तयारी झाली आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या पातळीवर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 107 meters high indian flag in pune