‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सव्र्हिसेस’च्या (एमईएमएस) ‘डायल १०८’ सेवेच्या रुग्णवाहिकांनी पुण्यात ८ हजाराहून अधिक जणांचा जीव वाचवला आहे. राज्यात मुंबईखालोखाल पुणेकरांनी या सेवेचा सर्वाधिक लाभ घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या सहकार्याने ९ महिन्यांपूर्वी राज्यात ही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल १ लाख २० हजार नागरिकांना या सेवेचा फायदा झाला आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ९ हजार ८१० नागरिक मुंबईचे तर त्याखालोखाल ८ हजार ४०७ नागरिक पुण्याचे आहेत.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा वापर ग्रामीण भागातही मोठय़ा प्रमाणावर केला जातो, मात्र मोठय़ा शहरांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांची संख्या जास्त दिसून येते, असे ‘एमईएमएस’चे प्रमुख संचलन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले. डॉ. शेळके म्हणाले, ‘‘पुण्यात प्रामुख्याने रस्ते अपघात आणि प्रसूतीशी संबंधित गुंतागुंती या बाबतीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा अधिक वापर केला गेला. हृदयविकार, अर्धागवायू आणि विषबाधेसारख्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतही या रुग्णवाहिका वापरल्या गेल्या.’’
मुंबई आणि पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये ६,४७०, औरंगाबादमध्ये ६,१३१, नाशिक आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी ५,९०२ जणांचा तर अहमदनगरमध्ये ५,१५० जणांचा जीव १०८ क्रमांकाच्या सेवेने वाचवला आहे.  
पुण्यातली ‘डायल १०८’ सेवा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये १०८ क्रमांकाच्या ४४ रुग्णवाहिका धावतात, तर पुणे जिल्ह्य़ातील रुग्णवाहिकांची संख्या ८४ आहे. जिल्ह्य़ात सुमारे २५० प्रशिक्षित डॉक्टर आणि २०० आपत्कालीन सहायक कार्यरत आहेत. ‘डायल १०८’ सेवेचे राज्यातील प्रतिसाद केंद्रही औंधच्या उरो रुग्णालयात आहे. या रुग्णवाहिकांसाठी १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून माहिती दिल्यानंतर सुमारे २० मिनिटांच्या आत रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचते असे डॉ. शेळके यांनी सांगितले. काही ठिकाणी रुग्णवाहिका १० मिनिटांच्या आत पोहोचून सेवा देऊ शकते, असेही ते म्हणाले. 

Story img Loader