पुणे : राज्यात दहावी आणि बारावीनंतरच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत (कटऑप डेट) तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १४ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्यातील शासकीय, खासगी अनुदानित, विद्यापीठ संचलित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शिक्षण संस्थांमध्ये दहावी आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर नियमित विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी प्रवेशासाठीची अंतिम मुदत आणि अन्य सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या. प्रवेश प्रक्रियेच्या केंद्रीभूत (कॅप) व्यक्तिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम मुदतीपर्यंत सुरू ठेवल्या जातील. संस्थास्तरावरील कोटय़ात किंवा केंद्रीभूत प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी ई छाननी पद्धत किंवा प्रत्यक्ष छाननी पद्धत याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>> Zilla Parishad Recruitment: २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…

संबंधित उमेदवारांनी संस्थांमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. त्या उमेदवारांची गुणवत्तायादी संस्थास्तरावर तयार केली जाईल. संस्थांनी १४ सप्टेंबपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थांना १५ सप्टेंबरला ऑनलाइन भरावी लागणार आहे. मात्र या तारखा अस्थायी स्वरुपाच्या आहेत. काही अपरिहार्य परिस्थितीत बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक  https://poly23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader