लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस लवकरच घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखांबाबत हरकती, सूचना मांडण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. त्यानुसार बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. तर बारावीचा निकाल मे अखेरीस, दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा, श्रेणीसुधार परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. पुढील शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणे, पुरवणी परीक्षा लवकर घेऊन निकाल जाहीर करणे या दृष्टीने आता वर्षानुवर्षे प्रचलित वेळापत्रकात बदल करून परीक्षा लवकर घेण्याचे नियोजन राज्य मंडळाने केले आहे. यंदा दहावीच्या निकालावेळी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या बदलांसंदर्भात सूतोवाचही केले होते.

आणखी वाचा-बनावट तिकिटाच्या आधारे विमान प्रवास करण्याचा प्रयत्न करणारा तरुण गजाआड

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत, लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दहावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आणि लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या दरम्यान घेण्याचे नियोजन आहे. शाळा-कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी संभाव्य तारखा जाहीर करण्यात आले आहे. विषयवार सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तारखांवरील हरकती, सूचना secretary.stateboard@gmail.com या संकेतस्थळावर पाठवण्याबाबत राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10th and 12th exam early this year probable dates announced by the state board pune print news ccp 14 mrj