पुणे : पुण्यात ११ अब्ज डॉलरचा (सुमारे ९० हजार कोटी रुपये) सेमीकंडक्टर प्रकल्पाचा प्रस्ताव आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी दिली. मात्र, पुण्यात नेमका कुठे हा प्रकल्प उभा राहणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजीव चंद्रशेखर बोलत होते.
हेही वाचा >>> पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
यावेळी स्वयंद्योजकांशी संवाद साधताना चंद्रशेखर यांनी पुण्यात ११ अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्पाचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. याचबरोबर हा प्रकल्प पुण्यात नेमका कुठे होणार याबद्दलही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. चंद्रशेखर म्हणाले की, पुण्यात ११ अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, अशी आशा मला आहे. केंद्र सरकारकडे आतापर्यंत सेमीकंडक्टर प्रकल्पांसाठी २.५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. हे प्रस्ताव जागतिक पातळीवरील कंपन्यांचे आहेत. भारत हा अतिशय वेगाने सेमीकंडक्टर देश बनत आहे.