पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरामध्ये उद्योगस्नेही वातावरण राहण्यासाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या औद्योगिक तक्रार निवारण पथकाकडे खंडणीचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ३१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पथकाकडून खंडणीखोरांची माहिती संकलित करून त्यांना समज देण्याचे कामही करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सुमारे ४० ते ४५ लाख इतकी लोकसंख्या येते. आळंदी- मरकळ, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी सुमारे दोन हजार छोट्या आणि तीनशे ते चारशे मोठ्या कंपन्या आहेत. यासह हिंजवडी माहिती व तंत्रज्ञान (आयटी) नगरी देखील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतच आहे. कंपन्यातील कंत्राट मिळवण्यासाठी स्थानिकांमध्ये स्पर्धा असते. माथाडीच्या नावाखाली कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कोणीही तक्रार देत नाहीत. पोलिसांनी आवाहन करूनही आवश्यक तेवढा प्रतिसाद मिळत नाही. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या तक्रारींचे तत्काळ निवारण व्हावे. तसेच, उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे, यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी २१ मार्च २०२३ रोजी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना केली. तेव्हापासून या पथकाकडे खंडणीच्या ११ तक्रारी आल्या. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्यातील ३७ आरोपींपैकी ३१ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>मांजामुळे दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जखमी, छत्रपती शिवाजी पुलावरील घटना

तक्रारींचे प्रमाण अत्यल्प

व्यवसाय करायचा असल्याने कंपनी मालक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. कर्मचाऱ्यांना दररोज येथेच कामासाठी यायचे असते. कर्मचारी, कंपनीतील अधिकाऱ्यांना रस्त्यात त्रास दिला जातो. कंपनीत एखादी घटना घडवून आणली जाते. कर्मचाऱ्यांचा संप करण्यास प्रवृत्त केले जाते. कंपन्यांनी पुढे येऊन तक्रार करावी. जो कोणी खंडणीखोराविरोधात तक्रार देईल त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथे संपर्क साधावा

खंडणी विरोधी पथकाकडून कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जात आहे. तसेच, कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचा समाजमाध्यमातील व्हॉट्सॲपचा ग्रुप देखील तयार करण्यात आला आहे. पथकाकडून कंपनी पदाधिकाऱ्यांची दररोज माहिती घेतली जाते. कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संबंध वाढवून गोपनीय माहिती संकलित केली जाते. पथकाचा व्हॉट्सॲप क्रमांक – ७५१७७५१७९३ हा असून, ईमेल आयडी – indgrevcell-cpc@mah.gov.in आहे. यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा >>>राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!

अनेक उद्योजकांना औद्योगिक तक्रार निवारण पथकाची माहिती नाही. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल म्हणाले. उद्योजकांना तक्रार करण्याची भीती वाटते. पोलिसांनी नाव गुप्त ठेवले जाईल असा विश्वास उद्योजकांना दिला पाहिजे. उद्योजक, संघटनांसोबत बैठक घेऊन पथकाची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली.

उद्योजकांनी खंडणीची तक्रार देण्याबाबत सातत्याने बैठका घेतल्या जातात. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यामुळे उद्योजकांनी स्वतःहून पुढे यावे, तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 cases registered against extortionists through industrial grievance redressal team pune print news ggy 03 amy