पुणे : अमूल डेअरीच्या उत्पादनांची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने ११ लाख रुपयांची फसवणूक केली. यापूर्वी गेल्या महिन्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्याच्या पत्नीला अशाच पद्धतीने गंडा घालण्यात आला होता.याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरटा आणि एका बँकेच्या खातेधाराकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात गुजरातमधील आनंद शहरातील एका बँकेच्या खात्याचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : पुण्यातील रंगपंढरी संस्थेची ‘विषाद’ एकांकिका ठरली प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी
चोरट्याने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. अमूल डेअरीच्या उत्पादनांची वितरण एजन्सी मिळवून देतो, असे सांगितले. त्या बदल्यात संबंधित महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. एका बँक खात्यात महिलेने ११ लाख रुपये जमा केले.दरम्यान, वितरक एजन्सी न मिळाल्याने महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.