विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख तसेच परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने चोरट्याने संगणक अभियंता तरुणीला ११ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका २९ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी विमाननगर भागात राहायला आहे. तक्रारदार तरुणी एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहे. तरुणीने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर तिची सायबर चोरट्याशी ओळख झाली. सायबर चोरट्याने संकेतस्थळावर बनावट नाव तसेच छायाचित्र वापरले होते. परदेशातील एका कंपनीत अधिकारी असल्याची माहिती त्याने दिली होती.
तरुणी आणि चोरट्याचा समाजमाध्यमातून संवाद वाढला. चोरट्याने तरुणीला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर भेटवस्तू पाठविण्यात आल्या असून विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतल्याची बतावणी चोरट्याने केली. तातडीने पैसे जमा केल्यानंतर भेटवस्तू मिळतील, असे चोरट्याने तरुणीला सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे देेऊन चोरट्याने तरुणीला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणीने ११ लाख १६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तिला भेटवस्तू मिळाल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.