Pune Crime: ११ वर्षांपूर्वी पुण्यातल्या सदाशिवपेठ भागात असलेल्या कुमठेकर रस्त्यावर दरोडा आणि खुनाची घटना घडली होती. पुण्यातला कुमठेकर रस्ता हा अत्यंत गजबजलेला आणि रहदारीचा परिसर. मात्र या भागात घडलेल्या या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. वृद्धेचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत.

पोलिसांनी ११ वर्षांपूर्वीच्या घटनेबाबत काय सांगितलं?

“आशा नारायण लगड या महिलेची हत्या ( Pune Crime ) ११ वर्षांपूर्वी झाली. त्या लक्ष्मी निवास या इमारतीच्या मालकीण होत्या. लक्ष्मी निवास ही इमारत कुमठेकर रस्ता या गजबजलेल्या भागातली फडतरे चौकातली इमारत आहे. या इमारतीतल्या घरात आशा नारायण लगड या एकट्यात राहात होत्या. पहिल्या मजल्यावर त्यांचं घर होतं आणि वरच्या दोन मजल्यांची घरं त्यांनी भाडे तत्त्वावर दिली होती. त्यांची दोन मुलंही त्याच भागात असलेल्या घरांमध्ये वास्तव्य करत होती.”

आशा लगड यांची हत्या कशी झाली?

आशा लगड या ३ जून २०१३ या दिवशी सकाळी आळंदीला गेल्या होत्या. त्या साधारण दुपारी ४.३० ला परतल्या. घरी येऊन त्यांनी चहा घेतला. यानंतर साधारण ५.३० च्या सुमारास त्यांच्या शेजाऱ्यांनी सहज पाहिलं तर त्या घरातल्या पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. शेजाऱ्यांनी तातडीने त्यांच्या मुलांना कळवलं. त्यांचा नातू या ठिकाणी आला, त्याला वाटलं की आजीला स्ट्रोक आल्याने ती बेशुद्ध झाली असावी पण रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत ( Pune Crime ) घोषित केलं.

हे पण वाचा- Navi Mumbai Girl Murder : निर्जनस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके; यशश्री शिंदेचा मृतदेह पोलिसांना कसा सापडला?

आशा लगड यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना काय सांगितलं?

आशा लगड यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घरातून रोख रक्कम आणि साधारण २ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार ( Pune Crime ) नोंदवण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने पुणे हादरलं.

आशा लगड यांच्या शवविच्छेदन अहवालातली माहिती काय?

आशा लगड यांचा गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात ही बाब समोर आली की त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तसंच पोलिसांनी या प्रकरणात एक दोन नाही तर ५० लोकांचे जबाब नोंदवले. ज्या ठिकाणी गुन्हा घडला तिथे डबे पोहचवण्यासाठी काही लोक यायचे त्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र ठोस पुरावा किंवा एखादा तरी धागा सापडतो असं काही हाती आलं नाही. हत्येमागचा उद्देश लूटमारच होता की आणखी काही? हे आता ११ वर्षानंतरही कोडंच आहे. पोलिसांना या खुनामागचं गूढ उकलता आलेलं नाही. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.