लोकसत्ता वार्ताहर
बारामती : ‘बारामती शहर आणि तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या आहेत. त्या सर्व मिळून दीड हजार कोटींच्या असतील. एका आमदाराला वर्षाला पाच कोटी याप्रमाणे पाच वर्षांत २५ कोटी रुपये मिळतात. बारामतीसाठी दीड हजार कोटी रुपये आणले आहेत. जानाई शिरसाई योजनेसाठी ४६० कोटी, पशुसंवर्धन विद्यालयासाठी ५६० कोटी रुपये, अशी जवळपास अकराशे कोटी रुपयांची कामे शंभर दिवसांच्या आत मंजूर केली आहेत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीमध्ये दिली.
बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथे टीसीएस फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा उजवा कालवा रायझिंग ते बोरकरवाडी तलावापर्यंत करण्यात आलेल्या जलवाहिनीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘सरकारने लाडक्या बहिणीकडे जास्त लक्ष दिले आहे. यासंदर्भात आमच्यावर टीका झाली. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, असे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही ही योजना बंद करणार नाही. शेतकऱ्यांसाठी वीज सुरू ठेवलेली आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा.’
‘गरीब वर्गाचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता लवकरच पुणे विभागात ३० हजार घरांचा कार्यक्रम घेतला आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ते तीन कोटी घरांचा कार्यक्रम घेतला आहे. महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर झाली आहेत. त्यापैकी पाच हजार घरे बारामतीसाठी मंजूर झाली आहेत,’ असेही पवार यांनी सांगितले.
‘काकांना विश्वासात घेतल्याशिवाय चालत नाही’
‘काकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काही चालत नाही,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बोरकरवाडीतील कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली. त्याचा उल्लेख करतानाच समोर बसलेले काका कुतवळ त्यांच्याकडे पाहत म्हणाले, ‘एका रस्त्याच्या कामकाजाबद्दल तुमच्याशी बोललो आहे, अधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना मी सांगितले आहे, की काकांना विश्वासात घ्या.’ एवढे बोलून अजित पवार काही क्षण थांबले आणि पुढे म्हणाले, ‘अहो, काकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे काही चालत नाही बाबा!’ त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी हसून दाद दिली. त्यावर, लगेचच, ‘मी काका कुतवळांबद्दल बोलतो आहे, नाही तर लगेचच तुम्ही दादा घसरले, असे म्हणाल. पण, दादा घसरलेले नाहीत,’ अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी
बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याच्या मूटी येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी भेट दिली. ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर सूरज महाराष्ट्रभर चर्चेत आला. त्याला घर बांधण्याची इच्छा होती. त्या वेळी त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. अजित पवारांनी दिलेले आश्वासन आता पूर्णत्वास येत असून, याबाबतचा आढावा घेण्यासाठी रविवारी पवार यांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट दिली.